आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात शुल्कवाढीमुळे सोन्याचा पारा आणखी वाढणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पिवळ्याधम्मक मौल्यवान धातूवरील आयात शुल्कात केंद्र सरकारने पुन्हा एकदा वाढ केल्यामुळे आता सोने आयात आणखी काहीशी खर्चिक होणार आहे. पण त्याहीपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीला आलेली मजबुती आणि नव्याने झालेल्या शुल्कवाढीमुळे सोन्याच्या किमतीत आणखी किमान अडीचशे ते तीनशे रुपयांनी वाढ होण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क खात्याच्या अधिकार्‍यांनी एका अध्यादेशाद्वारे आयात शुल्कात वाढ करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही आठवड्यांत सोन्याच्या किमतीत अचानक घसरण झाली होती. परंतु आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या किमतीत पुन्हा सुधारणा होऊ लागल्यानंतर सरकारने आयात शुल्क कमी केले होते.

अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने त्यावर काय परिणाम होणार असे विचारले असता बुलियन तज्ज्ञ अश्विन देरासरी म्हणाले की, अक्षय्य तृतीयेच्या अगोदरच सोन्याच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याचा भाव 29 हजार रुपयांच्या वर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लग्नसराईची खरेदी आतापासूनच केलेली चांगली ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला. चालू खात्यातील तूट फुगण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पिवळ्या धातूच्या मागणीला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी महिन्यात सोन्याची आयात 11.8 टक्क्यांनी घटून ती 50 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 2.7 लाख कोटी रुपयांवर आली आहे. मूल्य स्वरूपात सोन्याची आयात 2009- 10 मध्ये 28 अब्ज डॉलर, 2010-11 मध्ये 40 अब्ज डॉलर आणि 2011-12 मध्ये 56 अब्ज डॉलर झाल्याचे वित्त राज्यमंत्री नमो नरिन मीणा यांनी गेल्या शुक्रवारी लोकसभेत माहिती देताना सांगितले होते. एप्रिल ते फेब्रुवारी महिन्यात सोने आयात मूल्य स्वरूपात 11.8 टक्क्यांनी कमी होऊन 50,637 दशलक्ष डॉलर तर सांख्यिक रूपात 1.6 टक्क्यांनी घसरून 9,51,170 किलोवर आली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

250 ते 300 रुपयांची वाढ
दोन आठवड्यांपूर्वी सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 25 हजार रुपयांपर्यंत घसरला होता. परंतु आता पुन्हा सोन्याच्या किमतीने जवळपास 2500 रुपयांची उसळी घेतली असून ती 28 हजार रुपयांच्या आसपास आहे. आयात शुल्कात वाढ केल्यानंतर या किमतीत आणखी 250 ते 300 रुपयांनी वाढ होण्याचा अंदाज बुलियन तज्ज्ञ अश्विन देरासरी यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

आयात शुल्कात वाढ
जागतिक सराफा बाजारातल्या किमतीतल्या चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आयात शुल्क ज्यावर किंमत निश्चित केले जाते त्या सोन्याच्या आधारभूत किमतीत प्रति 10 ग्रॅममागे 472 डॉलर वाढ केली आहे. परंतु चांदीच्या शुल्कात बदल करण्यात आलेला नसून ते एक किलोमागे 762 डॉलर असेच ठेवण्यात आले आहे. सोन्याच्या किमती घसरल्यामुळे दहा दिवसांपूर्वीच ही किंमत कमी करून 449 डॉलरपर्यंत (प्रति 10 ग्रॅम) आणण्यात आली होती. यापुढे आयात शुल्कात आणखी वाढ करण्याची शक्यता नसल्याचे वक्तव्य अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टोकियो येथे केले होते. परंतु सरकारने याच महिन्यात सोन्याच्या आयात शुल्कात वाढ करून ते प्रति 10 ग्रॅम 516 डॉलरवरून प्रतिग्रॅम 521 रुपयांवर, चांदीवरील आधारभूत किंमत 930 डॉलरवरून (प्रतिकिलो) 920 डॉलरवर आणली होती.