आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोने-चांदीचा तेजोत्सव !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रुपयाची घसरण आणि अमेरिकेतून मिळणारे संकेत यावर आरूढ झालेला सोन्याचा रथ शनिवारी तेजीने पुन्हा झळाळला. चांदीनेही मागे न राहता तेजीच्या चकाकीवरील वाटचाल सुरू ठेवली. मुंबई सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 635 रुपयांनी वाढून 31,945 झाले. चांदीने किलोमागे 2260 रुपयांच्या चकाकीसह 54,260 ही पातळी गाठली. स्थानिक सराफा बाजारातील सोन्याच्या किमतीचा हा नऊ महिन्यांचा उच्चांक आहे.

आगामी सणांचा हंगाम आणि लग्नसराई यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत तेजी आल्याचे सराफा व्यापा-यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया आणि फेडरल रिझर्व्हकडून मिळणारे संकेत यामुळे सराफा बाजाराला झळाळी आली आहे. जागतिक बाजारातही सोने-चांदी तेजीत आले. न्यूयॉर्क सराफा बाजारात सोन्याची किंमत औंसमागे 1.5 टक्क्यांनी वाढून 1396.30 डॉलर झाली. हा 11 आठवड्यांचा उच्चांक आहे. शनिवारी सोने 25 डॉलरने वधारले. तर चांदीच्या सप्टेंबर वायद्याच्या किमती औंसमागे 23.74 डॉलर झाल्या. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे देशातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी आल्याचे सराफा व्यापा-यांनी सांगितले.

तेजीची कारणे
० जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेत
० देशातील सणांचा हंगाम आणि आगामी लग्नसराई
० अमेरिका फेडरल रिझर्व्ह आर्थिक पॅकेज सुरू ठेवण्याचे संकेत
० अमेरिकेतील बेरोजगारीच्या आकडेवारीत वाढ
० अमेरिकेतील घरांच्या मागणीत झालेली घट
० डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

खरेदी सुरू ठेवावी
गुंतवणूकदारांनी सोन्याची खरेदी सुरू ठेवावी. यासाठी बाय ऑन डीपच्या सूत्रांनुसार खरेदी करावी. म्हणजे किमती खाली आल्यानंतर खरेदी करावी. तेजी आल्यावर थांबावे. पुन्हा किमती उतरल्यानंतर खरेदी करावी. म्हणजे किमतीतील तीव्र चढ-उतारांचा फटका गुंतवणुकीला बसणार नाही. विश्वनाथ बोदाडे, वरिष्ठ व्यवस्थापक, आनंद राठी ब्रोकर्स.

पुढे काय
डॉलरच्या तुलनेत रुपयाने मागील आठवड्यात 65.56 असा नीचांक नोंदवला. चालू खात्यातील तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने सोने आयातीवर अनेक निर्बंध लादले. त्यामुळे पुरवठा कमी झाला. देशातील सणांचा हंगाम आणि आगामी लग्नसराईत सोन्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सोने तेजीत राहील असे मत जाणकारांनी व्यक्त केले.