आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्या-चांदीचे दागिने बनवण्यासाठी घडणावळ ग्राहकांना पडतोय महागात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आंतरराष्ट्रीय तसेच देशातील सराफा बाजारात सोन्याच्या किमती गतीने घसरल्या. स्वस्त झालेले सोने खरेदी करण्याची संधी ग्राहक सोडणार नाहीत. ते मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतील, अशी अपेक्षा दागिने कंपन्यांची आहे. दुसरीकडे दागिने तयार करणारे छोटे व्यावसायिक ग्राहकांकडून जास्त घडणावळ घेत आहेत. त्यामुळे आगामी काळात ब्रँडेड दागिन्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. सोन्यावरील आयात शुल्क आणि घडणावळीचा काहीच संबंध नसल्याने ग्राहकांकडून नाहक जास्त पैसे घेण्यात येत असल्याचे सोने व दागिन्यांच्या घाऊक व्यापा-यांचे म्हणणे आहे.


सोने स्वस्त झाल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडून घडणावळीच्या नावाखाली जास्त पैसे घेण्यात येत आहेत. सोन्यातील घसरणीनंतर घडणावळीपोटी ग्राहकांकडून 400 ऐवजी 500 रुपये घेण्यात येत असल्याचे काही मोठ्या ज्वेलर्सनी सांगितले. सोने 30 हजार रुपये तोळा असताना घडणावळीसाठी 300 रुपये घेण्यात येत होते. आता सोन्याच्या किमती 25 हजारांच्या मागे-पुढे असताना घडणावळीपोटी 250 रुपये आकारण्यात येत आहेत.


सोने आणि हि-याचे रिटेलर कामा शेचरचे मालक हेमचंद्र शहा यांनी सांगितले की, विक्री वाढवण्यासाठी छोटे ज्वेलर्स ग्राहकांकडून घडणावळीच्या नावाखाली जास्त पैसे घेत आहेत. सोन्यावरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरून 8 टक्के झाल्याचे कारण सांगून ते ग्राहकांकडून जास्त पैसे घेत आहेत. मात्र, किरकोळ खरेदीसाठी हे शुल्क लागत नाही. हे शुल्क सोन्याच्या मोठ्या खरेदीवर घाऊक सराफा व्यापा-यांकडून आकारण्यात येते. किरकोळ सराफा व्यापा-यांना उधारीवर सोने मिळायचे, मात्र आता रोख रक्कम देऊन सोने खरेदी करावे लागते. त्याची भरपाई हे व्यापारी ग्राहकांकडून करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारची घडणावळ घेत नसल्याचा दावा ब्रँडेड दागिन्यांचे निर्माते तसेच मोठ्या ज्वेलर्सनी केला आहे.


ब्रँडेड दागिन्यांची चांदी
अश्मी, नक्षत्र आणि संगनी यांसारखे ब्रँड तयार करणा-या गीतांजली समूहाचे सीईओ संजीव अग्रवाल यांच्या मते, सोने आणि चांदीच्या किमतीतील घसरणीनंतर शुक्रवारपासून खरेदीसाठी येणा-या ग्राहकांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली आहे. ज्यांच्याकडे लग्न समारंभ आहे किंवा काही शुभकार्य आहे असे ग्राहक या संधीचे सोने करत आहेत. यामुळे विक्री वाढण्याची शक्यता आहे. मुंबईस्थित शगुन अँड सन्सचे शंतनु शाह यांच्या मते, घसरणीनंतर ग्राहक पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे वळले आहेत. ब्रँडेड दागिन्यांना मोठी मागणी आहे.


अशी होते लूट
> आयात शुल्कवाढीचे कारण सांगून ग्राहकांकडून दागिन्यांच्या घडणावळीपोटी जास्त पैसे घेण्यात येत आहेत.
> सोन्यातील मोठ्या घसरणीनंतर दागिन्यांची घडणावळ म्हणून 400 ते 500 रुपये घेण्यात येत आहेत.
> सोने 30 हजार रुपये तोळा असताना घडणावळीसाठी 300 रुपये आकारले जायचे.
> घडणावळ किंवा मेकिंग चार्ज घेत नसल्याचा ब्रँडेड ज्वेलर्सचा दावा.