आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने-चांदीवरील विश्वासाला तडा, डिसेंबरपर्यंत मंदी राहणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धनत्रयोदशीला तोळ्यामागे २८ हजारांवर चकाकणा-या सोन्याचे तेज दिवाळीपासून सातत्याने कमी होत आहे. तेव्हापासून सोने तोळ्यामागे १७२० रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदी किलोमागे ३५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. वायदा बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती गेल्या चार ते पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहेत. सराफा तज्ज्ञांच्या मते, मौल्यवान धातूंची ही घसरण डिसेंबरच्या अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.या वर्षअखेरीस सोने आणि चांदीच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बहुतेक गुंतवणूकदार सोने व चांदीतील गुंतवणूक काढून ती शेअर बाजारात टाकत आहेत. सर्वसाधारणपणे कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर त्यातील गुंतवणूक सोने व चांदीकडे वळते. मात्र या वेळी त्याची जागा डॉलरने घेतली आहे. त्यामुळे सोन्यात दीर्घकालीन घसरणीची शक्यता आहे.

घसरणीची कारणे
* फेडरल रिझर्व्हकडून रोखे खरेदी बंद करण्याची घोषणा - अमेरिका फेडरल रिझर्व्हने २९ ऑक्टोबर रोजी रोखे खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डॉलरला मोठी मागणी आली. शुक्रवारी डॉलर इंडेक्सने ८७.१३ चा उच्चांक नोंदवला. मागील तीन महिन्यांत डॉलर इंडेक्समध्ये १० टक्क्यांची तेजी आली आहे.
* अमेरिकेत आर्थिक सुधारणा सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या जीडीपीमध्ये ३.७ टक्के वाढ दिसून आली. परिणामी, सोन्यात होणारी गुंतवणूक थांबली. कॉमेक्स बाजारात सोने घसरले.
* जपानकडून आर्थिक पॅकेजची घोषणा : जपानने आपल्या अर्थव्यवस्थेत ७२६ अब्ज डॉलर आणण्याची घोषणा केली. या पावलामुळे जपानच्या येनचे मूल्य ६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आले. त्याचा परिणाम सोन्यावर िदसून आला.

वर्षभरात २४ टक्के घसरण
चांदीने एका वर्षात २४ टक्के आणि सोन्याने ८.८ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. कमोडिटी तज्ज्ञ आदित्य जैन यांच्या मते, सर्वसाधारणपणे सोन्यात हेजिंगसाठी गुंतवणूक केली जाते. या वेळी कच्च्या तेलातही मंदी आहे. तरीही गुंतवणूकदार सोन्याकडे वळलेले नाहीत. काही वर्षांपूर्वी गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय मानल्या जाणा-या सोन्यात आता ज्या प्रकारे चढ-उतार दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्या-चांदीवरील विश्वास उडाला आहे.

चांदी ३२ हजार तर सोने २५ हजारांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता
सोने-चांदी आता मंदीच्या चक्रात अडकले आहेत. आगामी काळातही घसरणीची शक्यता असल्याचे मत बॉम्बे बुलियन असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश हुडिया यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते डिसेंबरअखेरपर्यंत एमसीएक्स बाजारात सोने तोळ्यामागे २५ हजार रुपयांपर्यंत घसरू शकते, तसेच चांदीच्या किमती किलोमागे ३२ हजारांपर्यंत खाली येऊ शकतात. एंजल ब्रोकिंगचे नवीन माथूर यांच्या मते, नववर्षापूर्वी सोने-चांदीत मोठी घसरण दिसून येईल.

अफवांवर विश्वास नको
सोन्याच्या भावात चढ-उतार राहणारच. मात्र, एका दिवसात ते १००० रुपयांनी घसरणार, असे कोणीही खात्रीशीर सांगू शकत नाही. सोन्याच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घडामोडींवर लक्ष ठेवावे व आपल्या क्षमतेनुसार खरेदी करावी. दत्ता सावंत, उपाध्यक्ष, महाराष्ट्र सराफ सुवर्णकार संघटना