आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याचे 33 हजारांकडे आगेकूच, नऊ महिन्यांचा उच्चांक पातळीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - डॉलरकडून सातत्याने होणारी रुपयाची धुलाई आणि शेअर बाजारातील अस्थैर्याला वैतागलेल्या गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा आता सोन्याकडे वळवला आहे. राजधानीतील सराफा बाजारात मंगळवारी त्यामुळे सोन्याला तेजीची झळाळी आली. सोने तोळ्यामागे 500 रुपयांनी वाढून 32 हजारांवर पोहोचले. मागील नऊ महिन्यांचा हा उच्चांक आहे. मागणीमुळे सलग तिस-या सत्रात चांदी तेजीत आली. चांदी किलोमागे 800 रुपयांनी वाढून 54,800 झाली.


तेजीबाबत सराफा व्यापा-यांनी सांगितले, डॉलरच्या तुलनेत रुपयाने 66 पातळी ओलांडली तसेच शेअर बाजारात झालेली पडझड यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवला. घसरणा-या शेअर बाजारातून निधी काढून तो सोन्यात गुंतवण्याकडे कल आहे. त्यामुळे सोने आणि चांदी तेजीने चकाकली आहे.


लंडन बाजारातही सोने औंसमागे 0.46 टक्क्यांनी वाढून 1,411 डॉलर झाले. जागतिक सराफा बाजारातील सोन्याच्या किंमतीचा हा दोन महिन्यांचा उच्चांक आहे.


तेजीची कारणे
० डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण
० देशातील शेअर बाजारातील अस्थैर्य
० सिरियातील पेच, अमेरिकेची हल्ल्याची तयारी
० अमेरिका फेडरल रिझर्व्ह आर्थिक पॅकेज सुरू ठेवण्याचे संकेत
० देशातील सणांचा हंगाम आणि आगामी लग्नसराई
० अमेरिकेतील घरांच्या मागणीत झालेली जून तिमाहीत झालेली घट
० जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेत


पुढे काय
डॉलरच्या तुलनेत रुपयाने 66.30 असा नीचांक नोंदवला. त्यातच अन्न सुरक्षा योजनेच्या खर्चाचा ताण अर्थव्यवस्थेवर जाणवणार आहे. चालू खात्यातील तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने सोने आयातीवर अनेक निर्बंध लादले. त्यामुळे पुरवठा कमी झाला. देशातील सणांचा हंगाम आणि आगामी लग्नसराईत सोन्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सोने तेजीत राहील असे मत जाणकारांनी व्यक्त केले.


खरेदी सुरू ठेवावी
गुंतवणूकदारांनी सोन्याची खरेदी सुरू ठेवावी. यासाठी बाय ऑन डीपच्या सूत्रांनुसार खरेदी करावी. म्हणजे किमती खाली आल्यानंतर खरेदी करावी. तेजी आल्यावर थांबावे. पुन्हा किमती उतरल्यानंतर खरेदी करावी. म्हणजे किमतीतील तीव्र चढ-उताराचा फटका गुंतवणुकीला बसणार नाही.
दत्ता सावंत, उपाध्यक्ष, राज्य सराफ संघटना