आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जदारांसाठी येणार सुगी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिझर्व्ह बँकेने तब्बल नऊ महिन्यांनी व्याजदर कपात केल्यामुळे कर्जदारांना नजीकच्या काळात सुगीचे दिवस येणार आहे. इतकेच नाही तर सीआरआर कपातीमुळे आर्थिक यंत्रणेत 18 हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवल आल्यामुळे बँकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. सहामाही पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर बहुतांश बँकांनी आपल्या बैठकीत व्याजदर कपातीबाबत विचार करण्याचे संकेत दिले आहेत. त्यातही ठेवींवरील व्याजदर कमी करण्यापेक्षा कर्ज स्वस्त करण्यावरच बँका जास्त भर देण्याची शक्यता आहे.

व्याजदर आणि रोख राखीव प्रमाण कमी झाल्यामुळे निधीचा खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याचे पंजाब नॅशनल बँकेचे अध्यक्ष- व्यवस्थापकीय संचालक के.आर. कामथ म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणानंतर आता व्याजदर कमी करण्याचा विचार केला जाईल असे मत सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ए.के. गुप्ता यांनी व्यक्त केले.
एचडीएफसीचे उपाध्यक्ष केकी मिस्त्री म्हणाले, निधी खर्च कमी झाल्यामुळे मॉर्गेज कर्जदार व्याजदर कमी करतील.
इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक ए. के. बन्सल म्हणाले,मध्यवर्ती बँकेचे पतधोरण बघता येणा-या दिवसांमध्ये व्याजदरात आणखी सुधारणा होणार आहे. त्यामुळे ठेवी आणि कर्जाच्या व्याजदराची उतरती भाजणी सुरू होऊन त्याचा आर्थिक वाढीला हातभार लागण्यास मदत होईल. तर बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक एन. शेषाद्री म्ङणाले, व्याजदराचा लाभ बँका ग्राहकांकडे हस्तांतरित करतील आणि ते कर्ज तसेच ठेवींवरील व्याजदरात दिसून येईल. ही कपात बहुतांशी पाव टक्के असेल एलआयसी हाउसिंगची कर्जे होणार स्वस्त सहामाही पतधोरण आढाव्यात अल्प मुदतीचे व्याजदर पाव टक्क्याने कमी झाल्यानंतर एलआयसी हाउसिंग फायनान्सने लगेचच आपली गृहकर्जे स्वस्त करण्याचे संकेत दिले आहेत.
बैठकीनंतर किती प्रमाणात व्याजदर कमी करता येऊ शकतील, याबाबत चर्चा करण्यात येईल. अर्थात त्याचा लाभ ग्राहकांपर्यत पोहोचवण्यात येईल, असे एलआयसी हाउसिंग फायनान्सचे संचालक आणि सीईओ व्ही.के. शर्मा यांनी सांगितले.एलआयसी हाउसिंगचा गृहकर्जावरील व्याजदर सध्या 10.25 टक्के (प्रतिवर्ष) असून प्राधान्यकृत कर्जदर 14.4 टक्के आहे.
संतुलित धोरण
आरबीआयचा दृष्टिकोन अत्यंत संतुलित आहे. महागाईने अंदाजाप्रमाणे कल दाखवला तर आणखी दरकपात शक्य आहे. सी. रंगराजन, चेअरमन, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समिती
योग्य वेळी निर्णय
अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकण्यासाठी आरबीआयने योग्य वेळी कपात केली आहे. माँटेकसिंग अहलुवालिया, उपाध्यक्ष, नियोजन आयोग

आरबीआयसमोर पेच कायम...
रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक विकासदराबाबतचा आपला अंदाज आणखी कमी केला आहे. त्यामुळे अगोदरच्या 5.8 टक्क्यांच्या तुलनेच चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर 5.5 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता पतधोरणात व्यक्त करण्यात आली आहे. महागाईच्या दर मार्च अखेरपर्यंत अगोदरच्या 7.5 टक्के अंदाजाच्या तुलनेत 6.8 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचे अनुमान मध्यवर्ती बॅँकेने व्यक्त केले आहे. व्याजदरात पाव टक्क्यांनी कपात केल्यानंतरही फुगलेल्या वित्तीय व चालू खात्यातील तुटीमुळे मात्र रिझर्व्ह बॅँकेसमोरील पेच कायम आहे.

पतधोरण आढाव्याची ठळक वैशिष्ट्ये
* आर्थिक वर्ष 2014 मध्ये महागाई कमी होण्याचे संकेत
* औद्योगिक उत्पादन थंडावले
* अति थंडीमुळे पिकांच्या भवितव्यात अडथळा
* मुख्य महागाईत लक्षणीय घसरण
* नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खाद्येतर उत्पादनांच्या महागाईत लक्षणीय घट
* अन्नधान्याचा महागाई दर दोन अंकी
* ग्राहक वस्तू निर्देशांकावर आधारित महागाईचा दर डिसेंबरमध्ये 10.6 टक्के
* महागाई अत्युच्च पातळीवरून घसरणीकडे
* आर्थिक वृद्धीचा अंदाज अगोदरच्या 5.8 टक्क्यांवरून 5.5 टक्क्यांवर
* मार्चमधील महागाई कमी, 6.8 टक्के राहण्याचा अंदाज
* रोकड सुलभतेची स्थिती बिकट राहणार
* चालू खात्यातील तूट ऐतिहासिक उच्च पातळीवर
* मागणीत सौम्य सुधारणांमुळे बाजारातील वातावरणाला चालना
* मागणीला चालना, पुरवठा साखळीतील अडथळे सुकर करण्यासाठी नव्याने गुंतवणुकीची गरज
* रचनात्मक सुधारणांची अंमलबजावणी गरजेची