तेजीचे दिवस - सेन्सेक्स व निफ्टीने नवे उच्चांक नोंदवले. औद्योगिक क्षेत्राची प्रगती सांगणाऱ्या आयआयपीने तीन महिन्यांचा उच्चांक नोंदवला, तर किरकोळ महागाईने घाऊक घसरणीसह चार वर्षांचा नीचांक दर्शवला. गेले अनेक महिने महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांसाठी आता चांगले दिवस येण्याचे संकेत बुधवारच्या आर्थिक जगतातील घडामोडींतून मिळाले....
मुंबई - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीला गळती लागल्याने शेअर बाजारातील तेजीला मात्र बुधवारी उधाण आले. वाहन कंपन्या, बँका आणि एफएमसीजी कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने नवे उच्चांक गाठले. सेन्सेक्सने ९८.८४ अंकांच्या कमाईसह २८,००८.९० ही विक्रमी पातळी गाठली, तर निफ्टीने २०.६५ अंकाच्या वाढीसह ८३८३.३० ही सर्वोच्च पातळी गाठली. विदेशी गुंतवणूकदारांनी भरभरून खरेदी सुरूच ठेवल्याने तेजीला धार आली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षांच्या नीचांकावर आल्याने गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला. स्मॉल आणि मिड कॅप समभागांनीही गुंतवणूकदारांना चांगलेच आकर्षित केले. जोरदार खरेदीमुळे बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक ०.२० टक्क्यांनी, तर मिड कॅप निर्देशांक ०.४७ टक्क्यांनी वधारले. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी १६ समभागांनी तेजी दाखवली. आशियातील प्रमुख बाजारात संमिश्र, तर युरोपातील बाजारांत घसरणीचा कल दिसून आला.
वाहन समभागांची धूम :
टाटा मोटर्स व महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांनी
आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे वाहन कंपन्यांच्या शेअर्सना मोठी मागणी आली. टाटा मोटर्सचे समभाग १.७१ टक्के वाढीसह ५३०.६० रुपयांवर बंद झाले, तर महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग १.१३ टक्के वाढीसह १२५३.२० रुपयांवर बंद झाले.
एफआयआय शेअर बाजारावर फिदा :
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) शेअर बाजारातून जोरदार समभाग खरेदी सुरूच ठेवली आहे. एफआयआयने मंगळवारी बाजारातून ४५८.०४ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली आहे. त्यामुळे तेजीला बळ मिळाले.
आकडेवारीवर नजरा :
महागाई दरात घसरणीची अपेक्षा बाजाराला आहे. तसेच व्याजदरात कपातीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला व निर्देशांकांनी नवे उच्चांक गाठले.
दीपेन शहा, रिसर्च हेड, कोटक सिक्युरिटीज
तेजीचे मानकरी
अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, आयटीसी, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी.
टॉप लुझर्स : सिप्ला, टाटा पॉवर, टाटा स्टील, एनटीपीसी