Home »Business »Gadget» Google Developes 3d Technology For Google Maps To Compete Apple

गुगल मॅपचा थ्री-डी अवतार

वृत्तसंस्था | Jun 08, 2012, 00:43 AM IST

  • गुगल मॅपचा थ्री-डी अवतार

न्यूयॉर्क- नेटीझन्ससाठी खुशखबर आहे. जगातील कोणताही भौगोलिक नकाशा आता इंटरनेटवर थ्री-डीच्या रूपात पाहता येणार आहे. ही सुविधा गुगल मॅप्सवर सुरू करण्यात आल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले.
आॅनलाइन रेखांकनांचा वापर सध्या जगातील अब्जावधी लोक करतात, असा दावा गुगलकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे गुगल मॅप्सला त्याचे अधिकारी सोडून गेल्याची बातमीही आली होती. अ‍ॅपल आपल्या प्लॅटफॉर्मवर गुगल मॅप्सचा वापर बंद करणार असल्याचीही एक बातमी आहे. त्याला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही, परंतु अ‍ॅपलने स्मार्ट फोन व टॅबलेटवर स्वत: चेच मॅपिंग तंत्र विकसित करणार असल्याचे सांगण्यात आले.
अ‍ॅपलच्या या हालचाली पाहूनच बुधवारी गुगलच्या अधिका-यांनी सॅनफ्रान्सिको येथील एका कार्यक्रमात आपल्या नवीन तंत्राचे प्रदर्शन केले. ही सुविधा आतापर्यंतची सर्वात अत्याधुनिक स्वरूपाची आहे, असे गुगल इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष ब्रायन मॅकक्लेडन यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान लवकरच स्मार्ट फोनवर विना इंटरनेटचे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी गुगलने अमेरिकेच्या हवाई विभागातील विमानांचा एक मोठा जत्थाच किरायाने घेतला होता. या विमानांच्या साह्याने हे नकाशे तयार करण्यात आले आहेत. गुगल मॅप्सचे कार्यक्रम व्यवस्थापक पीटर बर्च यांनी सांगितले की, ही एक जादुई गोष्ट आहे. याची तुलना केवळ सुपरमॅनशी करता येऊ शकते.
एखाद्या खासगी हेलिकॉप्टरच्या साह्याने शहरावरून घिरट्या माराव्यात तशातलाच काहीसा हा प्रकार वाटेल. काही आठवड्यात ही सुविधा अँड्रॉइड व इतर स्मार्ट फोनवर उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे अ‍ॅपलकडून मिळणा-या कथित आव्हानाच्या बातम्यांवर काही टिप्पणी करण्यास गुगलच्या अधिका-यांनी नकार दिला.

Next Article

Recommended