आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी नोकरी ते यशस्वी उद्योग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगल्या पगाराची सरकारी नोकरी सोडून उद्योग व्यवसायाकडे वळणे म्हणजे वेडाप्रकार असे कोणीही म्हणेल, पण आपण जसे कुटुंबावर प्रेम करतो तसेच प्रेम व्यवसायावर केले तर यशाच्या मागे धावावे लागत नाही ते आपसूकच आपल्यामागे धावते या ठाम विचाराने अरुण दरेकर यांनी थेट सरकारी नोकरीला रामराम ठोकून व्यवसायात झेप घेतली. अर्थात आपल्या आवडीच्या क्षेत्रात जम बसवताना त्यांना घरातील मंडळींची नाराजी सुरुवातीला सहन करावी लागली, पण दरेकर ग्रुप ऑफ कंपनीजचे एक यशस्वी उद्योजक म्हणून गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. दरेकर यांचे वडील मधुकर दरेकर प्रख्यात पॉवर लिफ्टर आणि महाराष्‍ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष असल्याने घरात ख-या अर्थाने ‘खेळकर’ वातावरण होते. वडिलांमुळे अरुण दरेकरही खेळाच्या विश्वात रमून गेले आणि त्यांनी खेळात अनेक पदके मिळवली. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमएचे शिक्षणपूर्ण केल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनातील डिप्लोमाही पूर्ण केला. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना वयाच्या 19 व्या वर्षीच रेल्वेत नोकरी मिळाली. व्यवसायाकडे कल असलेल्या दरेकरांना सरकारी नोकरी रुचली नाही. राजीनामा देऊन ते जुहूतील हॉलिडे इन हॉटेलमध्ये हेल्थ क्लब व रिक्रिएशन मॅनेजर म्हणून रुजू झाले. याच ठिकाणी व्यवसायाचे चक्र ख-या अर्थाने फिरले आणि त्यांनी याच भागात व्यावसायिक जिम्नॅशियम भाड्याने घेण्याचे धाडस केले. एक महिन्याच्या आत हेल्थ क्लब, जलतरण तलाव , हाऊस किपिंग या सुविधांचे व्यवस्थापन करण्याची जे. सी. कन्स्ट्रक्शन राकेश मलिक यांनी टाकलेली जबाबदारीदेखील सहज निभावून नेली, पण हे सगळे इतके सोपे नव्हते. व्यवसायात पाऊल टाकताना भांडवलासाठी पाचशे रुपये नसतानाही इतकी हिम्मत कुठून आली हे त्यांनाही उमजले नाही. मलिक यांच्याकडून मिळालेल्या कामानंतर त्यांनी हॉलिडे इनचा राजीनामा दिला. परंतू बांधकाम सुरू असताना काय करणार हा प्रश्न होता. मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी हेल्थ क्लब उभारणीसाठी निविदा भरली, पण त्यासाठी लागणारी 37 हजार रुपयांची अनामत रक्कम कुठून भरणार. अखेर पत्नीचे दागिने गहाण ठेवले. ‘ठोकर खाके इन्सान ठाकूर बनता है’ ही उक्ती दरेकरांच्याबाबतीत चपखल लागू पडते. एका छोट्या व्यवसायातून सुरू झालेला प्रवास ‘दरेकर ग्रूप ऑफ कंपनीज’च्या स्थापनेपर्यंत आला असून वार्षिक उलाढाल 40 कोटी रुपयांवर गेली आहे. इतकेच नाही तर कोकण हॉस्पिटॅलिटी अ‍ॅँड अ‍ॅग्रो टूरिझम या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकल्पही उभारले आहेत. बागायती शेती, सेंद्रिय पद्धतीने भाज्या, फलांची लागवड, फूड मॉल्स, कमी दरात औषधांची दुकाने, कोकण फूड रेस्टॉरंट, बोटिंग क्लब, अल्प मुदतीची पिके, त्रितारांकित हॉटेल, इंग्रजी माध्यमाची शाळा, व्यायामशाळा सामग्री व व्यवस्थापन असे कितीतरी उपक्रम राबवले जात आहेत. या प्रकल्पांना योग्य ती चालना देण्यामध्ये ते व्यस्त आहेत. दरेकर म्हणतात की गेल्या पंधरा वर्षांत मराठी व्यावसायिकाची मानसिकता बदलली आहे. मराठी मुलांमध्ये व्यवसायाची शिखरे पादाक्रांत करण्याची क्षमता आहे. फक्त शिक्षण झाल्यानंतर नोकरी करण्याची मानसिकता बदलणे गरजे आहे. त्याचबरोबर आपला पाया भक्कम करून त्या दिशेने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.
शब्दांकन : संतोष काळे, मुंबई