मोबाइल क्रमांक सुरू / मोबाइल क्रमांक सुरू होणार 3,5,6 या अंकांनी

बिझनेस ब्युरो

Mar 31,2012 11:20:36 PM IST

नवी दिल्ली- देशात गतीने वाढणा-या मोबाइलधारकांमुळे दूरसंचार विभागासमोर तसेच मोबाइल कंपन्यांना आता क्रमांकांची चणचण भासत आहे. 9, 8 तसेच 7 अंकांनी प्रारंभ होणा-या मालिकेतील बहुतेक क्रमांकांचे वाटप झाले आहे. त्यामुळे दूरसंचार विभाग आता 3, 5 आणि 6 या नव्या अंकांसह क्रमांक जारी करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे 2 अब्ज 75 कोटी नवे क्रमांक उपलब्ध होणार आहेत.
मोबाइल ग्राहकांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे मोबाइल कंपन्यांना क्रमांकांची टंचाई भासत आहे. त्यावर तोडगा म्हणून दूरसंचार विभागाने 11 अंकी क्रमांक देण्याचा विचार केला होता. मात्र, दोन कंपन्या वगळता इतर सर्व कंपन्यांनी यास विरोध केला होता. 11 अंकी क्रमांक दिल्यास अडचणी अधिक वाढतील, असे मत या कंपन्यांनी व्यक्त केले होते. आता दूरसंचार विभागाने 3, 5 आणि 6 अंकाने प्रारंभ होणारे क्रमांक देण्याची मागणी दूरसंचार नियामक -ट्रायकडे केली आहे. सध्या या क्रमांकांची मालिका लँडलाइनसाठी वापरात आहे. जर नवी क्रमांक मालिका जाहीर झाली तर कंपन्यांना 10 वर्षे तरी क्रमांकाची टंचाई भासणार नाही. 5 अंकाने प्रारंभ होणारे 94 कोटी 75 लाख क्रमांक, 6 ने प्रारंभ होणारे 100 कोटी 45 लाख आणि 3 पासून प्रारंभ होणारे 78 कोटी 99 लाख नवे क्रमांक मोबाइल कंपन्यांना उपलब्ध होणार आहेत.

X
COMMENT