नवी दिल्ली - देशातील बाजारपेठांत बटाट्याच्या किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी केंद्र सरकारने बटाट्यासाठी 450 डॉलर प्रतिटन असे किमान निर्यात मूल्य गुरुवारी जाहीर केले आहे. कांद्यानंतर बटाट्याची निर्यात रोखण्यासाठी सरकारने किमान निर्यात मूल्याचा आधार घेतला आहे. किंती नियंत्रणासाठी यापूर्वीच बटाटा वायदा व्यवहारावर निर्बंध टाकण्यात आले आहेत.
विदेशी व्यापार महासंचालनालयाने हे किमान निर्यात मूल्य तत्काळ लागू केल्याचे म्हटले आहे. अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केल्याप्रमाणे सरकारकडून निर्यातीवर कडक निर्बंध घालण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कांद्यापाठोपाठ बटाटा निर्यातीवर किमान मूल्य आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील बाजारात कांदा नियंत्रणात राहावा यासाठी 17 जून रोजी कांद्यासाठी 300 डॉलर प्रतिटन असे किमान निर्यात मूल्य सरकारने जाहीर केले होते.
त्यानंतर राजधानी दिल्लीत बटाट्याच्या किमतीने तेजी दर्शवली होती. पंधरवड्यापूर्वी 15 ते 20 रुपये किलो असणारा बटाटा सध्या 25 ते 30 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे सरकारकडून हे पाऊल टाकण्यात आले. बटाट्याच्या वायदा बाजारातील सौद्यावरही एफएमसीने नुकतेच निर्बंध घातले आहेत.
भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमती भडकल्याने घाऊक महागाईने पाच महिन्यांतील उच्चांकी 6.01 टक्के ही पातळी गाठली. त्यानंतर सरकारने प्रतिबंधात्मक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.