मुंबई - पुरवठ्यात सुधारणा करण्याबरोबरच किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात किमतीमध्ये प्रतिटन 500 डॉलरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्यातदारांना किमान निर्यात किमतीच्या खाली निर्यात करण्याची परवानगी नसते. अगोदरच्या सरकारने मार्च महिन्यात किमान निर्यात किंमत रद्द केली होती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये किमान निर्यात किंमत पुन्हा आणण्यात आली. गेल्याच महिन्यात ही किंमत प्रतिटन 300 डॉलर अशी निश्चित केली होती.
सध्या कांद्याच्या किरकोळ किमती भडकल्या आहेत त्या प्रतिकिलो 25 ते 30 रुपयांपर्यंत गेल्या असून दिल्लीत घाऊक किमती प्रतिकिलो 18.50 रुपयांच्या आसपास आहेत. केंद्र सरकारच्या मंत्रालयांतर्गत समितीने 30 जून रोजी किमान निर्यात किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. कांदा पिकवणार्या आणि वापर असलेल्या मंडईमध्ये कांद्याच्या किरकोळ आणि घाऊक किमतीत वाढ झाली आहे. कारण सध्या कांद्याची किमान निर्यात किंमत प्रतिटन 300 रुपये
असतानाही कांदा निर्यातीमध्ये अपेक्षित घट झालेली नसल्याचे समितीला दिसून आले आहे.
देशात पुरेसा साठा असतानाही यंदा कमी पाऊस पडण्याच्या अंदाजामुळे कांद्याच्या किमतीत वाढ होत आहे. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याच्या किमतीत जवळपास 80 टक्क्यांनी वाढ होऊन त्या प्रतिकिलो 18.50 रुपयांवर गेल्या आहेत.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)