मुंबई - वित्तीय तूट 4.1 टक्क्यांपर्यंत आटोक्यात आणण्याचे लक्ष्य साध्य करणे कठीण आव्हान आहे; परंतु अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून महसूल संकलनातही वाढ होत आहे. त्यामुळे वित्तीय तुटीचे लक्ष्य साध्य करणे सरकारला साध्य होऊ शकेल, असे मत वित्त सचिव अरविंद मायाराम यांनी व्यक्त केले.
जीडीपीच्या तुलनेत वित्तीय तूट 4.1 टक्क्यांवर मर्यादित ठेवणे कठीण लक्ष आहे; परंतु अर्थव्यवस्था वेग घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून सरकारदेखील अनेक धाडसी निर्णय घेत आहे. महसूल संकलनातही वेग येण्याची अपेक्षा मायाराम यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
यंदाच्या अर्थसंकल्पातील लक्ष्याच्या तुलनेत वित्तीय तूट जूनअखेर संपलेल्या तिमाहीत वाढली असल्याचे सांगून मायाराम पुढे म्हणाले की, काही महिन्यांमध्ये सरकारचा खर्च जास्त होता, त्यामुळे त्या महिन्यात महसूल वाढीचे प्रमाणही जास्त असण्याची गरज नाही.
वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना कर सवलत मर्यादेत वाढ करणे, गृहनिर्माण क्षेत्राला सवलती तसेच उद्योग क्षेत्रातील वाढीला चालना देण्यासाठी वाहन आणि अन्य क्षेत्रांना अप्रत्यक्ष करात दिलासा यांसारख्या अनेक उपाययोजना जाहीर केल्या होत्या.
जीडीपी वाढीचे संकेत : गेल्या दोन आर्थिक वर्षांत पाच टक्क्यांच्या खाली असलेली आर्थिक वाढ (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात 5.4 ते 5.9 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटलेली महागाई, चांगले औद्योगिक उत्पादन, वाहन विक्रीत वाढ यामुळे जीडीपी वाढण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.