आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात पॅटर्नमुळे कापूस उत्पादक उजळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात कापसाला कमी भाव मिळत असताना गुजरातचे व्यापारी जागेवरच क्विंटलमागे 100 ते 200 रुपये अधिक देत असून बहुतांश शेतकरी त्यांनाच कापसाची विक्री करत आहेत. शेतातूनच कापसाची विक्री होत असल्याने वाहतूक व मजुरांवरील खर्च वाचत आहे. दुसरीकडे परराज्यात कापूस जात असल्याने जिनिंगच्या अडचणी वाढल्या आहेत.
सध्या जिनिंगमध्ये 4,400 ते 4,600 क्विंटलप्रमाणे कापसाची खरेदी होत आहे. गुजरातचे व्यापारी ब्रोकरच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या घरातून कापूस खरेदी करत आहेत. अधिक दर व खर्च वाचत असल्याने सध्या वाळूज परिसरातील तुर्काबाद खराडी परिसरातून दररोज 20 पेक्षा जास्त कापसाचे ट्रक गुजरातकडे जात आहेत. एका ट्रकमध्ये 130 क्विंटल कापूस जातो. जिल्ह्यातून दररोज 100 हून जास्त कापसाच्या ट्रक गुजरातेत जात असल्याचे या भागातील जिनिंग मालक हरिश्चंद्र शितलंबे यांनी सांगितले. कापूस मिळत नसल्यामुळे काही जिनिंग सुरू झालेल्या नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्याच्या महसूलाला कात्री :
मराठवाड्यात 650 पेक्षा अधिक जिनिंग आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीला क्विंटलमागे 45 रुपये द्यावे लागतात. एका हंगामात हजारो क्विंटल खरेदी जिनिंगच्या माध्यमातून होत असल्यामुळे कृषी उत्पन बाजार समितीला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. तसेच विक्रीकरासह अनेक कर जिनिंगला द्यावे लागतात. मात्र, गुजरातच्या या व्यापार्‍यांना कोणताही कर द्यावा लागत नाही. त्यामुळे राज्याचा महसूल बुडत आहे.
शेतकर्‍यांचा फायदा
गुजरातच्या व्यापार्‍यांमुळे शेतकर्‍यांना क्विंटलमागे किमान 300 रुपयांचा फायदा होत आहे. स्पध्रेत शेतकर्‍यांचा फायदा होईल. मानवेंद्र काचोळे, राज्य कार्य. सदस्य, शेतकरी संघटना.
जिनिंगवर परिणाम
गुजरात पॅटर्नमुले जिनिंग उद्योगावर 30 टक्के परिणाम होत आहे. खरेदी कमी झाल्यास या ठिकाणी काम करणार्‍या मजुरांचा प्रश्न निर्माण होईल. गुजरातमध्ये 1 टक्का कर नसल्यामुळे त्यांना भाव देणे परवडते. अजय सोमाणी, सचिव, औरंगाबाद जिनिंग असोसिएशन.
आम्हालाही फटका
गेल्या वर्षी 70 गाडी कापूस खरेदी केला होता. या वर्षी 200 गाडी कापूस खरेदी करण्याचे नियोजन आहे. मात्र, ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढल्याचा फटका आम्हालाही बसत आहे. सुरेश मेघनाथी, व्यापारी, गुजरात.