आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचडीएफसी, रिलायन्स फंड मालमत्तेत अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत सप्टेंबर महिन्यात चार टक्क्यांची घट होऊन ती 8.08 लाख कोटी रुपयांवर आली असल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्सने (अ‍ॅम्फि) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. त्या अगोदरच्या तिमाहीत ही मालमत्ता 8.47 लाख कोटी रुपये होती. डिसेंबर 2010 नंतर म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत झालेली ही सर्वाधिक घसरण आहे.


डॉलरच्या तुलनेत रुपयाचे लक्षणीय अवमूल्यन झाल्यानंतर समभाग आणि कर्ज बाजारपेठेत निर्माण झालेल्या चढ-उताराचा गुंतवणकदारांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. परिणामी, देशातील एकूण 44 म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी 34 नोंदणीकृत म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्ये सप्टेंबरमध्ये घट झाली आहे.


एचडीएफसी, रिलायन्सची आघाडी
व्यवस्थापनाखालील मालमत्ता कमी होऊनदेखील एचडीएफसी आणि रिलायन्स म्युच्युअल फंडांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. एचडीएफसीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत दोन टक्क्यांनी घट होऊन ती 1.03 लाख कोटींवर, तर रिलायन्स म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत पाच टक्क्यांनी घट होऊन ती 93.200 कोटी रुपयांवर आली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सात टक्क्यांनी घसरून 85,20 कोटी रुपयांवर येऊनदेखील कंपनीने तिसरे स्थान कायम ठेवले आहे. रुपयाच्या लक्षणीय अवमूल्यनामुळे लिक्विड फंडांतून मोठ्या प्रमाणावर निधीचा ओघ बाहेर गेला आहे; परंतु आता रुपया थोड्या प्रमाणात बळकट झाल्यामुळे ही परिस्थिती लवकरच स्थिरावेल, असा आशावाद मोतिलाल ओस्वाल, एएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सोमय्या यांनी व्यक्त केला.


दुस-या बाजूला भांडवल बाजारात बहुतांश बड्या कंपन्यांच्या समभाग किमती गडगडल्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तादेखील सहा टक्क्यांनी कमी होऊन ती 1.86 लाख कोटी रुपयांवर आली आहे. तोटा भरून काढण्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी युनिट्स विकण्यावर भर दिला आहे.


गोल्ड इटीएफची झळाळी वाढली
गोल्ड इटीएफ बाजारातील मरगळ मात्र झटकली गेली आहे. स्थानिक बाजारातील सोन्याच्या किमती वाढल्यामुळे गोल्ड इटीएफ फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता वाढली आहे. त्यातच जागतिकस्तरावरील किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन यामुळेदेखील गोल्ड इटीएफला झळाळी आली आहे.