आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर खरेदीला दुष्काळाच्या गाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठवाड्यातील अवर्षणाच्या भीषण परिस्थितीचा या भागातील रिअल इस्टेट क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. मागणी थंडावल्यामुळे तीन ते चार महिन्यांत केवळ चार ते पाच नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू होऊ शकले आहेत. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर खरेदीचे प्रमाण रोडावण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.


मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा घर खरेदीवर थोडासा परिणाम झाला आहे. त्यातून जिल्हाधिकारी बांधकामे थांबवणार, अशा बातम्या येत असल्याने घर खरेदी करण्याबाबत ग्राहकांमध्ये जरा साशंकता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत रिअल इस्टेट बाजार थंड झाला असला तरी मंदीचे वातावरण आहे, असे म्हणता येणार नाही. घरांची चौकशी करण्याचे प्रमाण वाढलेले असले तरी त्याचे रूपांतर प्रत्यक्ष घर खरेदीत होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे रिअल इस्टेट क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणा-या क्रेडाइ या संस्थेचे औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


सध्याचे मंदीचे वातावरण लक्षात घेऊनही विकासकांनी घरांच्या किमती नियंत्रणात ठेवल्या असल्यामुळे ग्राहक त्याचा फायदा घेत आहे. अलीकडेच खास गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनालाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून परवडणा-या घरांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे, परंतु मागच्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या खरेदीच्या तुलनेत घर खरेदीचे प्रमाण यंदा सरासरी 50 टक्क्यांनी घटले असल्याचे पाटील म्हणाले. अथर्व बिल्डर्स अ‍ॅँड डेव्हलपर्सचे मनोज जैन यांनी मागील वर्षाच्या गुढीपाडव्याच्या तुलनेत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांचे ब-याच प्रमाणात कमी झाले. मागच्या पाडव्याला जवळपास 20 ते 25 प्रकल्प सुरू झाले होते, पण यंदाच्या वर्षी ते प्रमाण नाही. घरांची विक्री जवळपास 90 टक्के रखडली असल्याचे मत व्यक्त केले.


भव्य गृहनिर्माण प्रकल्पांवर विपरीत परिणाम झाला असून पूर्वी अशा घरांचे 25 ते 100 असे बल्क बुकिंग केले जायचे, पण आता तेही प्रमाण कमी झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत व्याजदर एक ते दीड टक्क्याने कमी झाले असला तरी त्याचा अपेक्षित परिणाम बाजारावर झालेला नसून ग्राहक संभ्रमावस्थेत असल्याकडे लक्ष वेधतानाच सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली असून जून महिन्यात चांगला पाऊस झाला तर दस-यापर्यंत रिअल इस्टेट बाजारात उठाव येईल, असा आशावाद जैन यांनी व्यक्त केला.


आकर्षक किंमत, सवलतींचा आधार
नवीन गृह प्रकल्प तसेच स्थावर मालमत्ता विकासकांकडून देण्यात आलेल्या विविध सवलतींमुळे जानेवारी ते मार्च य कालावधीत देशातल्या सर्व शहरांतील घर विक्रीला काही प्रमाणात गती आली असल्याचे अमेरिकेतील मेरिल लिंच या वित्तीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. गृह खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन गृह प्रकल्पांमध्ये घरांच्या आकर्षक किमती, सवलती आणि विविध योजना देऊ केल्यामुळे मान्यवर रिअल इस्टेट ब्रँडच्या घर विक्रीने या कालावधीत वेग घेतला असल्याचे अहवालात म्हटले आहे.


गृह कर्जे स्वस्त नाहीतच
रिझर्व्ह बॅँकेने व्याजदर कमी केलेले असले तरी निधीच्या वाढत्या खर्चामुळे गृह कर्जांचे व्याजदर तातडीने कमी करण्याची गृह कर्जदार संस्थांची सध्या तरी मानसिकता नाही. मुंबईत अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात एचडीएफसीचे उपाध्यक्ष केकी मिस्त्री यांनीदेखील निधीचा खर्च कमी झाल्यास त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येईल, असे म्हटले होते. येत्या तीन मे रोजी सादर होणा-या पतधोरण आढाव्यातही रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता नसल्याचा सूर काही वित्तीय संस्थांनी आळवला आहे.