आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जॉइंट होम लोन’ घेऊन घर खरेदी फायद्याची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसाधारणपणे गृहकर्ज (होम लोन) ही बहुतेकांच्या जीवनातील सर्वात मोठी जबाबदारी असते. त्यामुळे याबाबत सतर्कता बाळगणे आवश्यक असते. अनेकदा आपण जास्त किमतीचे घर खरेदी करू इच्छितो. मात्र, त्यासाठी लागणार्‍या कर्जाची रक्कम देण्यास बँकेच्या दृष्टीने आपण पात्र नसतो. अशा वेळी संयुक्त गृहकर्ज (जॉइंट होम लोन) हा पर्याय ही अडचण दूर करू शकतो. एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे कर्ज घेणे म्हणजे संयुक्त कर्ज होय. या कर्जप्रकाराची वैशिष्ट्य आणि फायदे जाणून घेऊया...
को-बॉरोअर्स : ज्यांच्या सोबत आपण कर्ज काढतो ती व्यक्ती सहकर्जदार (को-बॉरोअर्स) असते. जास्तीत जास्त सहा सहकर्जदार असू शकतात. साधारणपणे अशा स्वरूपाचे गृहकर्ज पती-पत्नी किंवा कर्जदार व त्याचे अपत्य यांच्याकडून घेतले जाते. मित्र किंवा कार्यालयातील सहकारी किंवा अविवाहित पार्टनरसोबतही असे कर्ज घेता येत नाही.
कर्जाचा कालावधी : समजा सहअर्जदार दांपत्य असेल, तर अशा स्वरूपाच्या कर्जाचा कालावधी 20 किंवा 25 वर्षे असू शकतो. समजा सहकर्जदार स्वत: -त्याचे अपत्य किंवा भाऊ-बहीण असेल, तर बहुतेक वेळा कर्जाचा कालावधी 10 वर्षांपेक्षा जास्त नसतो. समजा स्वत: कर्जदार आणि त्याचे अपत्य संयुक्तपणे कर्ज घेत असतील आणि कर्जाची परतफेड अपत्याऐवजी त्यांच्या उत्पन्नातून होत असेल, तर त्याच्या निवृत्तीपर्यंत कर्जाचा कालावधी मर्यादित राहतो.
कागदपत्रे : सहअर्जदारांना नो युअर कस्टमर (ग्राहक ओळखा : केवायसी) संबंधीची आवश्यक कागदपत्रे बँकेला द्यावी लागतात. यात रहिवासी पुरावा, ओळखपत्राचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला व सर्व सहअर्जदारांचे बँक स्टेटमेंट यांचा समावेश असतो. याशिवाय घराच्या संयुक्त मालकीचा पुरावाही सादर करावा लागतो.
परतफेड : सहकर्जदारांपैकी एकाच व्यक्तीला ईएमआय भरावा लागतो. एकाच्या बँक खात्यातून किंवा संयुक्त खात्यातून ही परतफेड करता येते. संपूर्ण वर्षासाठी ईएमआयचा भरणा करण्याचा पर्यायही निवडता येतो. असे असले, तरी कर्जाच्या परतफेडीसाठी सर्व सहकर्जदार व्यक्तीश: तसेच वेगवेगळे अशा प्रकारे जबाबदार असतात, हे लक्षात घ्या.
संयुक्त गृहकर्जाचा पर्याय का निवडावा?
जास्त कर्जासाठी : घर खरेदीसाठी रक्कम कमी पडत असेल, तेव्हा संयुक्त गृहकर्जाचा पर्याय योग्य ठरतो. यात सहकर्जदाराचे उत्पन्न जोडल्याने कर्जाची इलिजिबिलिटी वाढून आपल्या स्वप्नातील घरांची खरेदी करता येते. समजा तुम्हाला एक कोटी रुपये किमतीचे घर खरेदी करायचे आहे, बँक 80 लाख रुपये कर्ज देण्यास तयार आहे. तुमची पत्नी-पती नोकरी करत असेल, तर त्यांच्या बरोबर संयुक्त गृहकर्ज घेतले तर दोघांच्या उत्पन्नानुसार बँक लोन इलिजिबिलिटी निश्चित करेल.
कर सवलत : बहुतेक नोकरदार पती-पत्नी कर लाभासाठी संयुक्त गृहकर्जाचा पर्याय निवडतात. त्यामुळे कौटुंबिक स्तरावर टॅक्स लायबिलिटी मोठ्या प्रमाणात कमी पडते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 (सी) अंतर्गत एका आर्थिक वर्षासाठी एक व्यक्ती परतफेड केलेल्या मुद्दलावर एक लाख रुपयांपर्यंत, तर कलम 24 (बी) अंतर्गत परतफेड केलेल्या व्याजापोटी दीड लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकते.
मात्र, संयुक्त गृहकर्ज घेतले असेल, तर पती-पत्नी दोघेही त्यांनी परतफेड केलेल्या मुद्दल आणि व्याजावर वेगवेगळा कर कपात दावा करू शकतात. समजा एका आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपये मुद्दल आणि चार लाख रुपये व्याज फेडले असेल, तर दोघांनी फेडलेल्या मुद्दलावर दोन लाख रुपये (प्रत्येकी एक लाख) आणि व्याजावर तीन लाख रुपये (प्रत्येकी दीड लाख) असा कर कपात दावा करता येईल.
अशा प्रकारे संयुक्त होम लोन घेतल्याने सामूहिक स्वरूपात जास्त बचत होते. त्यामुळे संयुक्त गृहकर्ज घेणे जास्त फायद्याचे आहे.
लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.