आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Loan Cheap ! Home Construction Field Gurantee Boost

होमलोन स्वस्त ! गृहनिर्माण क्षेत्राला हमीचे बूस्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील गृह क्षेत्राला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गृहकर्ज देणा-या कंपन्या तसेच बँकांना आता इंडिया मार्गेज गॅरंटी कॉर्पोरेशन (आयएमसीजी) च्या रूपाने तारणाची हमी मिळणार आहे. यामुळे अशा प्रकारच्या कर्जावरील बँकांची जोखीम कमी होऊन व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. ही हमी 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या कर्जावर मिळणार आहे.

देशातील गृह क्षेत्र नियामक राष्ट्रीय गृह बँकेचे (एनएचबी) अध्यक्ष व मुख्य संचालक आर.व्ही वर्मा यांनी सांगितले, आयएमसीजीच्या अधिकृत नोंदणीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) रीतसर अर्ज करण्यात आला आहे. आरबीआयकडून हिरवा कंदील मिळताच कंपनीचे कामकाज सुरू होईल. मार्चअखेर कंपनी सुरू होण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेत 2008 मध्ये आलेल्या मंदीनंतर मॉर्गेज गॅरंटी कंपन्यांना मिळालेले यश आणि भारतातील गृहकर्ज थकबाकीदारांची वाढती संख्या विचारात घेता या कंपनीच्या स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे.

आयएमसीजीमध्ये सर्वाधिक भागीदारी (38 टक्के) एनएचबीची आहे, तर 36 टक्के हिस्सा अमेरिकेच्या जेनवर्थ फायनान्शियलचा आहे. इतर भागीदारांत आशियाई विकास बँक (13 टक्के) आणि इंटरनॅशनल कॉर्पोरेशनचा (13 टक्के) समावेश आहे. आयएमसीजीच्या संचालक मंडळ अध्यक्षपदी वर्मा यांचीच निवड झाली आहे. वर्मा यांच्या मते, ही कंपनी सुरू झाल्यानंतर देशातील गृहनिर्माण क्षेत्राला आणखी एक बूस्ट मिळण्याची शक्यता आहे. कारण गृहवित्त पुरवठा करणा-या कंपन्या तसेच बँकांना या कर्जावर आयएमसीजीकडून हमी देण्यात येणार आहे. या अंतर्गत एखाद्याने कर्ज थकवले तर त्याची परतफेड आयएमसीजीकडून होणार आहे. मात्र, यासाठी बँकांना गॅरंटी शुल्क द्यावे लागणार आहे. हे शुल्क नेमके किती राहील, हे अजून निश्चित झालेले नाही. या कंपनीमुळे गृहनिर्माण क्षेत्राला स्थैर्य येईल. बँकांची भांडवली बचत शक्य होईल. बँकांना भांडवलाची उपलब्धता होईल. तसेच कर्जावरील जोखीम कमी झाल्याने होमलोनवरील व्याजदरात कपात शक्य होईल. याशिवाय एखाद्या मालमत्तेच्या तारणावर अपेक्षेपेक्षा अधिक रकमेचे कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो.

हमी
20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या गृकर्जावर आयएमसीजीकडून हमी मिळणार
फायदा काय
बँकांची, गृहवित्त पुरवठा करणा-या कंपन्यांची गृह कर्जावरील जोखीम कमी होणार
कमी व्याज
जोखीम कमी झाल्याने होमलोनवरील व्याजदरात कपात शक्य होईल
जास्त कर्ज
जोखीम कमी झाल्याने तारणावर अधिक रकमेचे कर्ज मिळण्याची शक्यता