आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होम लोन शिफ्ट करताना लक्षात ठेवण्याजोग्या बाबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहकर्जाचे व्याजदर आगामी काळात कमी होण्याची शक्यता आहे. आरबीआय आणि व्यावसायिक बँका व्याजदरांत कपात करण्याची शक्यता आहे. जर तुमच्या सध्याच्या बँकेचा व्याजदर बाकीच्या बँकांच्या तुलनेत अधिक असेल तर इतर बँकेत कर्ज हस्तांतरित करण्याची हीच योग्य वेळ आहे. कर्ज शिफ्ट करण्यासाठी काय काय पावले उचलावी लागतात, याची माहिती पुढीलप्रमाणे...

*आपल्या कर्जाच्या रकमेवर इतर बँका काय व्याजदर आकारत आहेत, याची माहिती घ्या. काही बँका 25 ते 30 लाख रुपयांपेक्षा कमी कर्जावर वेगळा व्याजदर आकारतात.
*तुम्ही जेव्हा बँकेची निवड कराल तेव्हा तेथे कर्जाच्या औपचारिकता काय असतील, कागदपत्रे आणि प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती घेऊन ठेवा.
*लोन पोर्ट करण्यासाठी तुमच्या सध्याच्या बँकेसोबत चर्चा करा. काही बँका किरकोळ शुल्क (कन्व्हर्जन फीस) भरण्यावर व्याजदरावर सवलत देत असतात. हे शुल्क साधारणत: इतर बँकांकडून घेतल्या जाणार्‍या प्रोसेसिंग फीस इतके असू शकते. जर सध्याच्या बँकेचे सुधारित व्याजदर इतर बँकेसारखेच असतील तर आहे त्या बँकेचेच कर्ज कायम ठेवणे फायदेशीर ठरेल.
*तुमच्या बँकेच्या इतर बँकेचे व्याजदर कमी असतील तर लोन शिफ्ट करण्यासाठी तुम्ही तुमची कागदपत्रे आणि इतर बाबींची तयारी ठेवावी.
*कागदपत्रे सादर केल्यानंतर नवी बँक त्याच्या प्रक्रियेसाठी काही वेळ घेईल. या दरम्यान तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा सर्व्हे करून लोन अ‍ॅग्रिमेंटही तयार ठेवावे.
*दरम्यान, बँक त्यांच्या नियमांनुसार तुम्हाला प्रोसेसिंग फीस, फ्रँकिंग आणि नोटरी चार्जेस, स्टॅँप ड्युटी, घराचा फायर इन्शुरन्सचा प्रीमियम आदी विविध शुल्क भरण्यास सांगेल.
*जेव्हा तुम्ही सर्व कागदपत्रे जमा करण्यासोबत सर्व शुल्क अदा कराल तेव्हा बँक आणि तुमच्यादरम्यान एका कर्ज करारावर स्वाक्षर्‍या होतील.
*यानंतर बँक कर्ज मंजूर करण्यासाठी चार-पाच दिवसांचा कालावधीत घेते.
*कर्जाच्या रकमेच्या चेकची आपल्या वकिलांकरवी खातरजमा केल्यानंतर बँक तो आपल्याला देते. चेक मिळाल्यावर तो लगेचच आपल्या कर्जाच्या खात्यावर जमा करावा.
*लोन क्लोजर फॉर्म भरून तो आपल्या सध्याच्या बँकेला द्यावा. तारण ठेवलेले प्रॉपर्टीचे सर्व दस्तऐवज परत करण्यासाठी अर्ज करावा.
*सध्याच्या बँकेला जेव्हा कर्जाची सर्व रक्कम मिळून जाते तेव्हा ती व्याज आकारणे बंद करते. प्रॉपर्टीची कागदपत्रे 7 ते 10 दिवसांत तुमच्याकडे सोपवली जातात.
*प्रॉपर्टीची कागदपत्रे तुम्हाला मिळाल्यानंतर ती नव्या बँकेत जमा करावी लागतात. अशा रीतीने गृहकर्ज हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण होते.

या बाबींकडे ठेवा लक्ष :
प्रीपेमेंट चार्जेस : फ्लोटिंग व्याज असलेले गृहकर्ज जेव्हा दुसर्‍या बँकेत शिफ्ट करताना प्रीपेमेंट चार्जेस लागत नाही. मात्र, फिक्स्ड रेटयुक्त गृहकर्जाच्या हस्तांतरणासाठी हे गरजेचे नाही. सध्याच्या बँकेकडून ती प्रीपेमेंट चार्जेस लावणार की नाही, याची माहिती घेऊन ठेवा.

डॉक्युमेंटेशन : नवीन बँक ‘नो युअर कस्टमर’ (केवायसी)ची माहिती मागते. यात तुम्ही तुमचे प्रॉपर्टीसंबंधित दस्तऐवज बँकेला दिले पाहिजे. जुन्या गृहकर्जाच्या नियमित परतफेडीकडे बघता काही बँका उत्पन्न आणि बँक स्टेटमेंट जमा करण्यातही काही सवलत देतात. जर तुम्ही जुन्या बँकेचे लोन स्टेटमेंट दिले तर तुम्ही ते कर्ज नियमितपणे फेडत होतात, याची पुष्टी होईल.

कर्जाचे पेमेंट : अनेकदा नवीन बँक कर्ज मंजूर केल्याच्या दोन दिवसांनंतर त्याचा चेक तुमच्याकडे सोपवते. मात्र, कर्जावरील व्याज हे ते मंजूर झाल्याच्या तारखेपासून आकारण्यास प्रारंभ झालेला असतो. म्हणजेच तुम्हाला दोन्ही बँकांत दोन-तीन दिवसांचे व्याज अदा करावे लागू शकते. कर्ज शिफ्ट करण्यापूर्वी नव्या बँकेत जाऊन याबाबत चौकशी करून ठेवावी. चेक दिल्याच्या तारखेपासूनच व्याजाची आकारणी करण्यात यावी, अशी विनंतीही केली जावी.

कर्ज हस्तांतरणाच्या प्रक्रियेत इतर शुल्क आणि चार्जेसच्या खर्चाची गोळाबेरीज केली तर ती तुमच्या गृहकर्जाच्या सुमारे 0.50 ते 0.75 टक्क्यापर्यंत पोहोचते. गृहकर्जाच्या एकूण रकमेचा विचार केला असता ही टक्केवारी नक्कीच किरकोळ नाही. म्हणून कर्ज हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्याआधी याबाबत नव्या बँकेकडून अत्यंत सविस्तर माहिती टिपून घेतली पाहिजे.