आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरांच्या किमती वाढणार; रेल्वेभाडे वाढल्याने सिमेंट महागले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वेभाडे, सिमेंट, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता रिअ‍ॅल्टी क्षेत्रातील किमती वाढण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या मालवाहतुकीच्या भाड्यात 6.4 टक्के वाढ झाली आहे. तसेच पेट्रोल लिटरमागे 1.69 रुपये आणि डिझेल लिटरमागे 50 पैशांनी महागले आहे. त्यातच सिमेंटच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्याने बांधकामाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे नवी घरे, फ्लॅट महागण्याची शक्यता आहे.

रेल्वे मालवाहतूक आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सिमेंट कंपन्यांनी सिमेंटचे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. श्री सिमेंटने रेल्वे मालवाहतुकीचे भाडे वाढल्यानंतर लगेच सिमेंटच्या किमती गोणीमागे आठ रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली होती. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (क्रेडाई) सिमेंटच्या विसंगत व मनमानी दरवाढीच्या विरोधात सीसीआयकडे आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. क्रेडार्ईच्या मते सिमेंटच्या किमतीतील वाढीमुळे घरे, फ्लॅटच्या किमती वाढवण्याचा दबाव विकासकांवर येत आहे. जे रिअल इस्टेट क्षेत्रासाठी चांगले लक्षण नाही.
सिमेंटची दरवाढ विसंगत
क्रेडाईच्या मते, सिमेंटच्या किमतीतील वाढ विसंगत आणि मनमानी असून त्याविरोधात सीसीआयकडे आव्हान देण्यात येणार आहे. सिमेंटच्या दरवाढीमुळे विकासकांवर घराच्या किमती वाढवण्याचा दबाव वाढला आहे. काही वर्षांपूर्वी सिमेंटच्या 50 किलो गोणीसाठी 120 रुपये मोजावे लागायचे, आता 320 रुपये द्यावे लागतात.

रिअ‍ॅल्टीच्या किमतीत होणार 20% वाढ
सिमेंट आणि सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) यांचा थेट संबंध आहे. गृहनिर्माण क्षेत्र सिमेंटचा सर्वात मोठा ग्राहक आहे. एकूण सिमेंटच्या खपात गृहनिर्माण क्षेत्राचा वाटा 67 टक्के आहे. सिमेंटबाबत इन्फ्रास्ट्रक्चर (13 टक्के), कमर्शियल कन्स्ट्रक्शन (11 टक्के) आणि औद्योगिक बांधकाम (9 टक्के) असा इतर क्षेत्रांचा वाटा आहे. सिमेंटच्या किंमतवाढीबरोबरच स्टीलची किंमतवाढ आणि मजुरांच्या वेतनातील वाढ यामुळे बांधकामाचा खर्च 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. असे झाले तर घरांच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

आणखी किमती वाढू शकतात
रांची : रेल्वे मालवाहतुकीचे दर वाढल्याने रांचीतील सिमेंटच्या किमती वाढल्या आहेत. पंधरवड्यापूर्वी सिमेंटच्या किमतीत गोणीमागे 10 रुपयांची वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मालवाहतूक महागल्याने आगामी काळात सिमेंट आणखी महागण्याची शक्यता आहे.