आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडा विरुद्ध हीरो भांडणात ग्राहकांचा होणार फायदा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आपला जुना भागीदार हीरोपासून फारकत घेतल्यानंतर होंडाने भारतातील वाहन बाजारात झेंडा रोवण्याचा निर्धार केला आहे. हीरोच्या विक्रीला शह देण्यासाठी होंडा आता सर्वात स्वस्त बाइक बाजारात आणणार आहे. 2020 पर्यंत देशातील क्रमांक
एकची मोटारसायकल कंपनी बनण्याची होंडाची योजना आहे.
होंडापासून वेगळे झाल्यानंतरही सध्या हीरो मोटोकॉर्प ही देशातील क्रमांक एकची मोटारसायकल कंपनी आहे. हीरो मोटोकॉर्पला त्या स्थानावरून खाली खेचण्यासाठी होंडाने कंबर कसली आहे. हीरोची 100 सीसी डॉन, स्प्लेंडर, पॅशन आणि 125 सीसीची सुपर स्प्लेंडर ही मॉडेल्स अत्यंत यशस्वी ठरली. आता होंडाने त्याच तोडीचे आणि कमी किंमत असणारी मॉडेल्स आणण्याचा निर्धार केला आहे. होंडाने यासाठी चीनचा सहारा घेतला आहे. होंडाची ही नवी बाइक 125 सीसीची असून तिची किंमत 30,000 रुपये राहील. हीरोच्या सीडी डॉनपेक्षा होंडाची नवी बाइक 4000 रुपयांनी स्वस्त असेल. होंडा अशा स्वरूपांच्या मॉडेल्सची विक्री सध्या आफ्रिकेत करत आहे.
होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया कंपनीने 2012-13 मध्ये भारतात 1000 कोटी रुपयांची गुंतवणुकीची योजना बनवली आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या आॅटो एक्स्पोमध्ये होंडाने 7 नवी मॉडेल्स सादर केली. आगामी चार महिन्यांत ही सर्व मॉडेल्स भारतीय बाजारात सादर करण्याची होंडाची योजना आहे. यात 110 सीसीच्या ड्रीम युगा, सीबीआर 150 आर, सीबी शाइनचे नवे मॉडेल तसेच सीबीआर 250 आरचे मॉडेल यांचा समावेश आहे. हीरोने याच एक्स्पोमध्ये तीन नवी मॉडेल्स सादर केली.
हीरोने 2011 मध्ये 60 लाख बाइक्सची विक्री केली आहे. हा एक जागतिक विक्रम आहे. कधीकाळी हातात हात घालून फिरणाºया या दोन कंपन्यांत फारकतीनंतर पेटलेल्या युद्धामुळे
ग्राहकांना मात्र दर्जेदार बाइक्स कमी किमतीत मिळणार आहेत.