आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृह, वाहन कर्ज महागणार; आरबीआयच्‍या पावलांमुळे बँकांना निधीची चणचण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाच्या सातत्याने होणार्‍या घसरणीचा परिणाम विविध बँकांवर होत आहे. ही घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँकांसाठी उपलब्ध असलेल्या रोख निधीवर अनेक निर्बंध लादले. त्यामुळे बँकांच्या रोख निधीचा झरा कोरडा पडत चालला आहे. त्यामुळे बँकांची डोकेदुखी वाढली आहे. या पेचातून बाहेर पडण्यासाठी बँका आपल्या मूळ कर्जदरात (बेस रेट) वाढ करण्याची शक्यता आहे. बँकांनी असे पाऊल उचलल्यास गृह, वाहन कर्जासह इतर कर्जे महागणार आहेत. कर्जाचा बेस रेट 0.25 ते 0.50 टक्के वाढवण्याची तयारी बँकांनी केली आहे. एवढेच नव्हे तर रिझर्व्ह बँकही रेपो दर वाढवण्याच्या मूडमध्ये आहे.

यासंदर्भात बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक सी. व्ही. आर. राजेंद्र यांनी सांगितले की, चलन बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक विविध उपायांचा वापर करते. याचा सर्वात जास्त परिणाम रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणार्‍या बँकांवर होतो. रिझर्व्ह बँकेने या कर्जाचे व्याजदर दोन टक्क्यांनी वाढवल्याने बँकांचा खर्च दोन टक्क्यांनी वाढला आहे.


शेअर बाजारावर परिणाम
रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रोख राखीव निधीची मर्यादा 70 टक्क्यांवरून 99 टक्के केली. बँक रेटही दोन टक्क्यांनी वाढवला. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. रिझर्व्ह बँकेच्या कडक पावलानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बाजारातील बँकिंग निर्देशांकातही मोठी घसरण झाली. सर्व बँकांचे शेअर 9 टक्क्यांपर्यंत घसरले.

डॉलरच्या तुलनेत रुपया मात्र सावरला
डॉलरच्या तुलनेत होणारी रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलांमुळे रुपया सावरला. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया दोन पैशांची कमाई करत 59.11 वर स्थिरावला. सलग दुसर्‍या दिवशी रुपयात सुधारणा दिसून आली. बुधवारी रुपयाने 63 पैशांची कमाई केली होती. डॉलरच्या तुलनेत रुपयाने केलेल्या सर्वाधिक कमाईपैकी ही एक आहे.


मोजावे लागणार जास्त दाम

महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसचे सीएफओ व्ही. रवी यांनी सांगितले की, सध्याची स्थिती लक्षात घेता कर्जाच्या खर्चात 0.25 टक्के ते 0.30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाले तर शुद्ध व्याज नफ्यावर त्याचा परिणाम होईल. एनबीएफसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या मते, एनबीएफसी कंपन्यांनी बँक तसेच रोखे बाजाराकडून मिळणार्‍या कर्जाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल. कमी व्याजदराच्या आधारेच या कंपन्या कॉर्पोरेट, हाउसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लोनबाबत बँकांशी स्पर्धा करू शकतात.


एनबीएफसीचे कर्ज वाढणार

रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत उचललेल्या पावलांमुळे बँकेतर वित्तीय पुरवठादार संस्थांवर (एनबीएफसी) विपरीत परिणाम होणार आहे. बहुतेक कंपन्यांच्या कर्जात वाढ होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांच्या दुसर्‍या तिमाहीतील शुद्ध व्याज नफ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे हाउसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लोन पोर्टफोलिओ कमी होण्याची शक्यता आहे. कारण बँकांपेक्षा या कंपन्यांचे कर्ज महाग असते.