आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Housing Project News In Marathi, Online Shopping, Divya Marathi

घरबसल्या क्लिकवर करा फ्लॅटचे बुकिंग, ऑनलाइन विक्री सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात ऑनलाइन शॉपिंग सध्या जोरात सुरू आहे. आता घरांचीही ऑनलाइन विक्री सुरू झाली आहे. इंटरनेटचे जाळे व्यापक झाल्याने बिल्डर्सनाही घर विक्रीसाठी ऑनलाइन पर्यायाची क्षमता लक्षात आली असून काही बिल्डर्सना त्यात चांगले यश मिळाले आहे.

मुंबईतील एक विकासक लोढा समूहाने नवी मुंबईच्या नजीक पलावा येथील टाऊनशिपसाठी ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून 100 हून जास्त बुकिंग मिळवले आहेत. लोढा समूहाचे प्रवक्ता म्हणाले, ऑनलाइन झाल्याने समूहाला ग्राहकांसोबत थेट नाते जोडण्यास चांगली मदत झाली. यामुळे ग्राहकांना मूलभूत माहितीसह बुकिंग आणि विक्रीसाठी मदत मिळते आहे.
या वर्षाच्या प्रारंभी टाटा समूहातील टाटा व्हॅल्यू होम्स या सहयोगी कंपनीने चार दिवसांच्या ऑनलाइन मोहिमेत आपल्या प्रकल्पातील 200 हून जास्त फ्लॅट्सची विक्री केली होती. यापूर्वी गुगल ऑनलाइन शॉपिंग कार्निव्हलमध्ये त्यांनी 50 घरांची विक्री केली होती.
टाट हाउसिंगचे प्रमुख (मार्केटिंग सर्व्हिसेस) राजीव दास यांनी सांगितले, 70 ते 80 टक्के घरांचा शोध ऑनलाइन होतो. त्यामुळे कंपनीने ऑनलाइन घर खरेदीचा पर्याय सादर केला. एनआरआय ग्राहकांसाठीही हे सोयीचे आहे.

बँकांचीही साथ
टाटा हाउसिंगने ऑनलाइन घरांच्या विक्रीसाठी आयडीबीआयसारख्या बँकांशी करार केला आहे. आता ग्राहकांना आपल्या पसंतीचा फ्लॅट ऑनलाइन बुक करता येणार असून क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे 50 हजार रुपये भरून बुकिंग करता येईल. त्यानंतर तो फ्लॅट त्या ग्राहकाला देण्यात येईल. त्यानंतरची प्रक्रिया ग्राहकाला ऑनलाइन तसेच ऑफलाइन पूर्ण करण्याचा पर्याय आहे.

ग्राहकांनी सतर्क राहावे
सोय होत असली, तरी ग्राहकांनी अशा स्वरूपाची ऑनलाइन खरेदी करताना सतर्कता बाळगावी. कारण ऑनलाइन बुकिंग रक्कम परत मिळत नाही. बिल्डर्सच्या मते, ऑनलाइन घर खरेदीचे अनेक लाभ आहेत. खासकरून किमतीबाबत चांगली माहिती याद्वारे मिळवता येते.

सर्व माहिती ऑनलाइन
सध्या बिल्डर्स आपल्या प्रकल्पाची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देत आहेत. आरएनए कॉर्पचे अध्यक्ष (मार्केटिंग) सुरजित सिंह यांनी सांगितले, यामुळे खरेदीदारांसाठी घर खरेदीचा निर्णय घेणे सोपे जाते. प्रकल्पाच्या ठिकाणी (साइट) कॅमेरे लावलेले असतात त्यामुळे ग्राहकांना प्रकल्पाच्या कामाची माहिती ऑनलाइन पाहता येते.