आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्‍करी जवानांसाठी पुण्‍यात उभारणार गृहप्रकल्‍प, निवृत्त जवानांचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सीमेवर किंवा देशाच्या दुर्गम भागात सेवेत असलेल्या जवानांना पुण्यासारख्या शहरात किफायतशीर दरात घर मिळावे यासाठी तिघा निवृत्त जवानांनी एकत्र येउन गृहसंकुल उभारण्याचे ठरविले आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागात अशाचप्रकारचे प्रकल्प राबविले जाणार असल्‍याची माहिती सुपरटेक कन्सट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक नारायण अंकुशे यांनी पत्रकारांना दिली.

अंकुशे हे लष्करातून निवृत्त झाले असून त्यांची जगातील विविध देशांना लष्करी सामग्री पुरविणारी अभियांत्रिकी कंपनी आहे. त्याचा वापर करून त्यांनी बांधकाम क्षेत्रात उतरण्याचे ठरविले असून पहिला प्रकल्प जवान, निमलष्करी दले आणि पोलिसांच्या घरांसाठी हाती घेतला आहे. संतोष सुर्यवंशी आणि मिहिर कुमार हे इतर दोन जवान प्रकल्प उभारणीत भाग घेत आहेत. या प्रकल्‍पात पहिल्या टप्प्यात 132 सदनिकांचा गृह प्रकल्प उभारला जाणार असून त्याचा ताबा 2015मध्ये दिला जाणार आहे. अंकुशे म्हणाले, फिल्डवर असलेल्या जवानांना पुण्यात घर घेणे परवडत नाही. तसेच लष्करातर्फे पुरविली जाणारी घरे मिळण्यास विलंब लागतो आणि त्याचे दर परवडू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन आम्ही प्रतिचौरस फुट 2900 रुपये दराने घरे बांधून देणार आहोत. हा प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर राबविला जाणार आहे. त्यासाठी एक्सिस बँक आणि सेन्ट्रल बँकेची मदत मिळणार आहे. प्रकल्पातील 60 टक्के सदनिका लष्कर, 20 टक्के निमलष्करी दले आणि उरल्यास 20 टक्के लोकांना दिल्या जातील. बांधकाम येत्या 15 ऑगस्टला सुरु होणार आहे. सध्या 65 टक्के सदनिका आगाऊ आरक्षित झाल्या आहेत. त्यातून भांडवलाची गरज पूर्ण होणार आहे.

आर्मी वेल्फेअर हौसिंगतर्फे मिळणारी घरे 3900 रुपये प्रतिचौरस फुट दराने दिली जातात आणि त्याची प्रतीक्षा यादी मोठी असते असे नमूद करून ते म्हणाले, की पहिला प्रकल्प वाघोली येथे होणार आहे. यामध्‍ये एक दोन आणि चार बेडरूमच्या सदनिका असून 22 ते 54 लाख रुपये किमती असतील. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात महत्वाची लष्करी ठिकाणे असलेल्या शहरात असे प्रकल्प राबवावे असा कंपनीचा विचार आहे. पुण्यानंतर कंपनी नगरमध्‍ये जाण्‍याचा विचार करीत आहे. अशाप्रकारचा प्रकल्‍प उभा राहत असल्याची पत्रे कंपनीने लष्करातील संबंधिताना पाठविली आहेत.