आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयपी निर्देशांक: फेब्रुवारीमध्ये 0.6 टक्क्यांवर, औद्योगिक चक्र पुन्हा मंदावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- औद्योगिक उत्पादनाने जानेवारी महिन्यात दाखवलेली चांगली वाढ फार काळ तग धरू शकलेली नाही. पायाभूत उद्योगातील घसरण, आटलेली मागणी, उत्पादन क्षेत्राची खराब कामगिरी, विद्युतनिर्मितीत झालेली घट याचा विपरीत परिणाम होऊन देशातील औद्योगिक उत्पादन फेब्रुवारी महिन्यात घटून 0.6 टक्क्यांवर आले आहे. औद्योगिक उत्पादनातील घट आणि उतरणीला लागलेली किरकोळ महागाई या दोन्ही गोष्टींमुळे विकासाला गती देण्यासाठी रिझर्व्ह बॅँक पुढच्या महिन्यात व्याजदर कमी करण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर आधारित औद्योगिक उत्पादनाने गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात 4.3 टक्के वाढीची नोंद केली होती. यंदाच्या आर्थिक वर्षातल्या एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत औद्योगिक उत्पादनात 0.9 टक्क्यांनी वाढ झाली, परंतु अगोदरच्या वर्षातील वाढीच्या तुलनेत त्यात 3.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
जानेवारी महिन्यात औद्योगिक उत्पादनात झालेली घट ही बहुतांशपणे गेल्या महिन्यात व्यक्त करण्यात आलेल्या 2.4 टक्क्यांच्या प्रस्तावित अंदाजित वाढीच्या पातळीवरच आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात जवळपास 75 टक्के वाट असलेल्या उत्पादन क्षेत्राने यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात केवळ 2.2 टक्के वाढीची नोंद केली आहे. त्याअगोदरच्या वर्षात याच कालावधीत औद्योगिक उत्पादनात 4.1 टक्क्यांची भरीव वाढ झाली होती. सर्व प्रमुख क्षेत्रांमधील उत्पादन वाढीचे प्रमाण यंदाच्या एप्रिल ते फेब्रुवारी महिन्यात एक टक्का इतके कमी राहिले आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत प्रमुख क्षेत्रांनी 3.7 टक्के वाढ साध्य केली होती.

औद्योगिक उत्पादन घसरून नकारात्मक पातळीवर गेले नाही ही एक थोडीशी समाधानाची बाब आहे. पुढील आर्थिक वर्षात औद्योगिक उत्पादनात सुधारणा होण्याचा आशावाद नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केला आहे.

यंदाचे आर्थिक वर्ष फारसे चांगले नाही; परंतु पुढील वर्षात आर्थिक विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादन वाढीचे प्रमाण नकारात्मक पातळीवर नसून ते फार कमी आहे, असेही अहलुवालिया म्हणाले.
औद्योगिक उत्पादन आणि किरकोळ महागाईची आकडेवारी लक्षात घेता तीन मे रोजी जाहीर होणार्‍या वार्षिक पतधोरण आढाव्यामध्ये गुंतवणुकीबरोबरच विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅँक व्याजदर कमी करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.


कर्ज स्वस्त हवे
रिझर्व्ह बॅँक आपल्या येणार्‍या पतधोरणात अल्पमुदतीच्या व्याजदरात एक टक्क्याने कपात करेल अशी अपेक्षा आहे. मानसिकतेत सुधारणा आणि विकासाला गती देण्याच्या दृष्टीने ही व्याजदर कपात गरजेची आहे.सुमन ज्योती खेतान, अध्यक्ष, पीएचडीसीसीआय

व्याजदर कपातीला वाव
आर्थिक वृद्धीतील नरमाईचे चित्र बघता व्याजदर कमी होतील. औद्योगिक उत्पादन आणि ग्राहक वस्तू निर्देशांकाची आकडेवारी स्वीकारार्ह पातळीच्या पलीकडे असल्याने रिझर्व्ह बॅँक व्याजदरात काही प्रमाणात कपात करेल अशी अपेक्षा आहे.
डी. के. जोशी, मुख्य अर्थतज्ज्ञ, क्रिसिल.