आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजार स्थिर होईपर्यंत वेट अँड वॉच धोरण हवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध फंड आणि व्यापारी, दलालांकडून झालेल्या जोरदार विक्रीमुळे अनेक समभाग गडगडले आहेत. सर्वक्षेत्रीय निर्देशांक अनेक महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. घसरता रुपया दररोज नवे नीचांक गाठतो आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केलेले अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. यामुळे गेल्या 10 पैकी 9 सत्रांत समभागात घसरण दिसून आली. खरेतर याची आणखी बरीच कारणे आहेत. मूळत: आर्थिक विश्वास डळमळला असून निराशेचे वातावरण आहे. सरकारकडून कोणतीच ठोस योजना जाहीर न झाल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.


मागील आठवड्यात सीएलएसए, गोल्डमॅन सॅक्स आदी संस्थांनी सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज घटवला आहे. त्यामुळे भारतीय समभागांतील आकर्षण कमी झाले आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर 5 टक्क्यांहून कमी राहण्याचा अंदाज, महसुली तूट, खर्चीक धान्य सुरक्षा विधेयक आणि कधीच न संपणारी चालू खात्यातील तूट यामुळे चिंतेत भर पडली आहे. यामुळे देशाच्या सार्वभौम पतमानांकनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच डगमगीत झालेल्या आर्थिक विकासावरही याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर कच्च्या तेलाच्या वाढणा-या किमतीमुळे या आगीत भर टाकली आहे. दुसरीकडे आर्थिक आणि चलन बाजारात स्थिरता आणण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकारचे उपाय तोकडे पडत आहेत. त्यामुळेही आर्थिक आघाडीवर निराशेमुळे स्थिती पॅनिक बनली आहे.


अनेक दिग्ग्ज कंपन्यांच्या तिमाही कामगिरीमुळे बाजाराची निराशा झाली. बीएचईएल, एल अँड टी, कोल इंडिया आणि इतर आघाडीच्या समभागांवर याचा परिणाम दिसून आला. केवळ माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या समभागांनी कशीबशी लाज राखली. मात्र, वाहनांची घटणारी मासिक विक्री, मॅन्युफक्चरिंग आणि सर्व्हिसेस पीएमआय निर्देशांकातील घसरण, महसुली तूट वाढण्याच्या शक्यतेने हे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारातील अनेक निर्देशांकात ठोस सुधारणा झाली असून तेथे आता नफेखोरी दिसत आहे. मात्र यामुळे कल मोठ्या प्रमाणात बदललेला नाही. चीनच्या बाबतीत पीएमआयच्या आकडेवारीने चिंता काहीशी कमी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील सहा सत्रात चीन बाजाराने जागतिक तुलनेत सर्वात चांगली कामगिरी केली आहे. थोडक्यात जगातील अनेक बाजारांत ठोस कलासह स्थिरता आली आहे.


जगातील अनेक बाजारांत डीप ओव्हरसोल्ड झोन दिसतो आहे. लवकरच तेथे तेजी दिसून येईल. बाजारात स्थैर्य येईपर्यंत गुंतवणूकदारांनी वेट अँड वॉच धोरण अवलंबणे केव्हाही चांगले. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी राजन यांच्या नियुक्तीच्या घोषणेनंतर रुपया गतीने सावरला. त्यांच्याकडून बाजाराला मोठी अपेक्षा आहे.
खालच्या दिशेने निफ्टीला 5452 आणि 5472 दरम्यान चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. या स्तरावरून निफ्टी पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. मात्र, हा आधार तुटल्यास निफ्टीला 5349 या पातळीवर चांगला आधार आहे. वरच्या दिशेने विचार केल्यास निफ्टीला 5664 वर अडथळा होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत निफ्टी ही पातळी पार करत नाही तोपर्यंत बाजारात निराशाजनक वातावरण राहील. या पातळीनंतर निफ्टीला 5723 वर अडथळा आहे. त्यानंतर 5812 वर तगडा अडथळा आहे. शेअर्सच्या बाबतीत सांगायचे झाले तर या आठवड्यात डाबर इंडिया लिमिटेड, बायोकॉन लिमिटेड आणि एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम दिसताहेत. डाबर इंडियाचा मागील बंद भाव 160.30 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 165 रुपये आणि स्टॉप लॉस 154 रुपये आहे. बायोकॉन लिमिटेड मागील बंद भाव 318.80 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 326 रुपये आणि स्टॉप लॉस 309 रुपये आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सचा मागील बंद भाव 160.70 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 167 रुपये आणि स्टॉप लॉस 153 रुपये आहे.


लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com
चे सीईओ आहेत.