आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Import Of Gold Dicreases, Government Tension Disappeared

सरकारचे सोनेरी टेन्शन घटले, सोने आयातीत लक्षणीय घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोन्याच्या आयातीला वेसण घालण्यासाठी करण्यात आलेल्या विविध कडक उपाययोजनांची फळे सरकारला चाखायला मिळू लागली आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याची आयात 95 टक्क्यांनी घसरून 2.5 टनांवर आली आहे. त्यामुळे रुपयाला बळकटी देण्यासाठी तसेच चालू खात्यातील तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरू असलेल्या कसरतींमध्ये सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.


सोने आयातीबाबत रिझर्व्ह बँकेने अलीकडेच जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत कोणतीही स्पष्टता दिसत नसल्यामुळे गेल्या महिन्यात विदेशी बाजारपेठेत सोन्याच्या किमती घसरल्या. सणासुदींचा अभाव आणि सराफा विक्रेत्यांच्या मागणीला बसलेला लगाम याचाही परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवर झाला असल्याचे या उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले.


फुगलेली चालू खात्यातील तूट कमी करणे हे सरकारसमोरील सध्या सर्वात मोठे आव्हान आहे. गेल्या आर्थिक वर्षात ‘जीडीपी’च्या तुलनेत 4.8 टक्क्यांवर किंवा 88 अब्ज डॉलरपर्यंत गेलेली चालू खात्यातील तूट यंदाच्या आर्थिक वर्षात जीडीपीच्या तुलनेत 3.7 टक्के किंवा 70 अब्ज डॉलरपर्यंत खाली आणण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी सोन्यासह अनावश्यक आयातीवर निर्बंध घालण्याचे कसोशीने प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहेत. परंतु त्याच्याच जोडीला यंदाच्या आर्थिक वर्षात रुपयाचेदेखील 20 टक्क्यांनी अवमूल्यन झाल्यामुळे सरकारची कात्रीत अडकल्यासारखी स्थिती झाली आहे.


विदेशातील सर्व खरेदीपैकी किमान 20 टक्के खरेदीची पुनर्निर्यात करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने नवीन नियमावली आहे. या नियमांबाबत आयातदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे 22 जुलैनंतर त्यांनी सोने आयात करणे थांबवले. त्याचप्रमाणे एप्रिल आणि मे महिन्यात करण्यात आलेल्या 304.5 टन विक्रमी आयातीनंतर सराफा व्यावसायिकांनी आता तो साठा वापरण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम सोन्याची आयात घटण्यावर झाला आहे.


सणासुदीचा हंगाम आणि ऑक्टोबरपासून सुरू होत असलेला लग्नसराईच्या हंगामातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सराफा व्यावसायिक आपल्याकडील साठ्याला पुन्हा बळकटी देणार. त्यामुळे सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात पुन्हा जवळपास 30 टनांनी वाढण्याचा अंदाज बॉम्बे बुलियन असोसिएशनच्या एका वरिष्ठ अधिका-याने व्यक्त केला.


सोने आयात : घसरणीचा आलेख
एप्रिल 142.50 टन
मे 162 टन
जून 31.5 टन
जुलै 47.5 टन
ऑगस्ट 2.5 टन