आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ब्रँड व्हॅल्यू’चे वाढते महत्त्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थकारणात आणि उद्योगक्षेत्रात मूल्यमापनाच्या नव्या नव्या कल्पना सतत येत असतात आणि त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे त्या महत्त्वाच्या ठरत जातात. पूर्वी उद्योगांत उलाढाल किती वाढली याला अधिक महत्त्व असे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर दर तिमाहीला जाहीर होणारा कंपनीचा नफा महत्त्वाचा ठरू लागला. कारण त्यावर कंपनीच्या शेअरची किंमत वधारणे वा गडगडणे अवलंबून असते. उद्योजकाची व्यक्तिगत मालमत्ता कमी ठेवण्याकडे आपला कल होता. कारण उद्योजक व्यक्तिगतरीत्या किती श्रीमंत आहे याला महत्त्व नव्हते. उदारीकरणानंतर उद्योजकाची व्यक्तिगत मालमत्ता वाढू लागली आणि अब्जाधीश होणे याची चर्चा सुरू झाली. जागतिक व्यापारात ‘ब्रँड’ हा नेहमीच महत्त्वाचा मानला गेला आहे. पण ‘ब्रँड व्हॅल्यू’ या नव्या संकल्पनेमुळे उद्योगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली आहे.
आजवर ब्रँड वाढवणे ही जबाबदारी प्रामुख्याने मार्केटिंग मॅनेजरची असे. सी. ई. ओ. आणि संचालक मंडळ उत्पादन वाढ, विक्री, उत्पादनाच्या नव्या कल्पना यावर चर्चा करत असे. ब्रँड या गोष्टीला स्वतंत्र महत्त्व आहे हे सर्वांनाच माहीत असले तरी त्या ब्रँडची स्वतंत्रपणे किंमत कोणी जोखली नव्हती. पूर्वी एखादी कंपनी विकत घेताना तिच्या नावासकट घेतली, तर खरेदीदार त्या कंपनीच्या मालमत्तेपेक्षा थोडी जास्त रक्कम ‘गुडविल’ म्हणून देत असे. हे गुडविल म्हणजेच त्या कंपनीवर असणारा ग्राहकांचा विश्वास असे. आता या गुडविलचे रूपांतर आक्रमक ब्रँडमध्ये झाले आहे. हे ब्रँडचे गणित पूर्वी भारतीय उद्योजकांना कळत नसले, तरी नकळतपणे टाटा, बिर्ला असे अनेक ब्रँड तयार होत गेले. भारतीय कंपन्या जेव्हा परदेशातील कंपन्या खरेदी करू लागल्या, तेव्हा त्या कंपन्यांच्या ब्रँड व्हॅल्यूचा प्रश्न उपस्थित झाला. गुडविल माहीत असले तरी ते आणि ब्रँड व्हॅल्यू यात खूप मोठे अंतर होते. उद्योगाचे मूल्यांकन ब्रँड व्हॅल्यूमध्ये होते आणि ही व्हॅल्यू एरवी फक्त संकल्पनेत असली तरी कंपनीची खरेदी-विक्री करताना या ब्रँड व्हॅल्यूचे रूपांतर प्रत्यक्ष किमतीत होते, हे लक्षात आले. साहजिकच भारतीय कंपन्यांचेही असे मूल्यांकन व्हावे, असे सर्वांना वाटू लागले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून असे मूल्यांकन आपल्याकडे सुरू झाले आहे.
एखाद्या उद्योगाची ब्रँड व्हॅल्यू ठरवायची कशी, हा यातला खरा कळीचा मुद्दा होता. उद्योगाची मालमत्ता, नफा-तोटा याचे स्वतंत्रपणे मूल्यमापन होतच होते. या सर्वापासून ब्रँड वेगळा काढून त्याची किंमत ठरवणे खरोखरच अवघड होते. त्यासाठी अशी कल्पना करण्यात आली, की त्या ब्रँडची मालकी त्या कंपनीची नाही. तो ब्रँड त्या कंपनीने दुसºयाकडून चालवायला घेतला आहे. अशा स्थितीत कंपनीला त्या ब्रँडसाठी दरवर्षी किती रक्कम मोजावी लागेल? ही संकल्पना ब्रँड व्हॅल्यू मोजण्याच्या दृष्टीने उत्तम असली तरी तिचा संबंध शेवटी त्या ब्रँडवर ग्राहकांचा विश्वास किती, यावरच अवलंबून असतो. उदाहरणार्थ टाटा हे उद्योगसमूहाचे नाव असले आणि त्यांचे सर्वच ब्रँड ‘टाटा’ नावानेच विकले जात असले, तरी प्रत्येक ब्रँडची व्हॅल्यूसारखी नाही. टाटा मोटर्स हा ब्रँड आताच्या सर्वेक्षणात सर्वोच्च स्थानी आहे. पण टाटा केमिकल्स मात्र पहिल्या पन्नासातून बाहेर फेकली गेली आहे. याचा अर्थ टाटा या नावाचा फायदा सर्वच ब्रँडना होत असला तरी त्या त्या ब्रँडच्या परफॉर्मन्सप्रमाणे त्याची व्हॅल्यू बदलत जाते.
अशा प्रकारे ब्रँड व्हॅल्यू काढण्याच्या तंत्रामुळे अनेक महत्त्वाचे फायदे उद्योगक्षेत्राला झाले आहेत. सर्वसाधारणपणे औद्योगिक कार्यक्रम छोट्या मुदतीचे असतात, पण भविष्यकाळात आपल्याला किती संपत्ती निर्माण करायची आहे, याचा विचार सहसा होत नव्हता. ब्रँड व्हॅल्यूमध्ये कंपनीचे भवितव्य दडलेले असल्याने आता ही ब्रँड व्हॅल्यू वाढवण्याकडे सगळ्यांचा कल आहे. साहजिकच ब्रँड हा विषय आता फक्त मार्केटिंग मॅनेजरचा राहिलेला नाही. तो सी. ई. ओ. आणि संचालक मंडळाचाही महत्त्वाचा विषय ठरला आहे.
आपली ब्रँड व्हॅल्यू सतत कशी वाढती ठेवायची आणि त्यासाठी काय काय करायचे, याचा विचार संचालक मंडळालाच सातत्याने करावा लागतो.
कोणत्या क्षेत्रामध्ये आपला ब्रँड चालणार आणि वाढणार आहे, याचा विचार करावाच लागतो. त्याबरोबर कोणती नवी क्षेत्रे उत्पादनासाठी हाती घेतली तर आपल्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ होईल याचाही विचार करावा लागतो. आपल्याकडे प्रामुख्याने औद्योगिक परिवार आहेत. त्या परिवारातील कोणीही एखादा उद्योग सुरू केला तर स्वाभाविकपणे त्या परिवाराचे नाव, म्हणजे टाटा, गोदरेज असे कंपनीला दिले जाते. आता ब्रँड व्हॅल्यू मोजण्यास सुरुवात झाल्यानंतर अशी नावे देण्यास परवानगी द्यायची का, असा प्रश्न या परिवारांपुढे आला आहे. उदाहरणार्थ, गोदरेज समूहाने या संबंधी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संयुक्त कुटुंबाचा आणि अधिकृतपणे गोदरेज समूहाचा जो उद्योग असेल, त्यालाच ‘गोदरेज’ हे नाव वापरता येईल. परिवारातील एखाद्या व्यक्तीने स्वतंत्रपणे एखादा उद्योग उभारला, तर केवळ ‘गोदरेज’ हे आडनाव आहे म्हणून त्या उद्योगाला गोदरेज ब्रँड वापरता येणार नाही.
ब्रँड व्हॅल्यूला आलेले हे महत्त्व भारतीय उद्योगांचा चेहरा-मोहराच बदलून टाकणार आहे. केवळ उत्पादन प्रक्रिया, इनोव्हेशन, विक्री या गोष्टी महत्त्वाच्या न राहता, ब्रँड व्हॅल्यू समोर ठेवून नवी धोरणे आखली जाणार आहेत. आताच्या सर्वेक्षणात पहिल्या पन्नास ब्रँडस्नी वर्षभरात आपली व्हॅल्यू एकत्रितपणे नऊ अब्ज डॉलर्सनी वाढवली आहे. आता सर्वांच्या नजरा या ब्रँड व्हॅल्यूकडेच राहतील, हे निश्चित.
(लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत.)