आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट रेटिंगचे महत्त्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडच्या काळात स्टँडर्ड अँड पुअर (एस अँड पी), मुडिझ, फिट्च या आंतरराष्ट्रीय पतनियामक संस्थांनी भारताच्या क्रेडिट रेटिंगसंदर्भात भाकीत केले होते. भारताने जर आपल्या येथील उद्योगांना व नवीन उद्योग धंदे भारतात येण्याकरिता योग्य अशी नीती व पतधोरण अमलात आणले नाही, तर भारताची आंतरराष्ट्रीय बाजारात पत कमी होण्याची व विकास गतीला खीळ बसण्याची शक्यता या संस्थांनी वर्तवली होती. त्या दृष्टिकोनातून घसरण कमी करण्याकरिता पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे क्रेडिड रेटिंग म्हणजे काय, ते कोण करतातआणि त्यांचे महत्त्व काय, हे जाणून घेणे उद्योजक, गुंतवणूकदार आणि भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडित प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त आहे.
क्रेडिट रेटिंग- एखादी वस्तू क्रेडिटवर घेणे म्हणजे त्यासाठी लागणारा पैसा कर्जाच्या रूपात घेणे होय. हा कर्जाचा कपात घेतलेला पैसा योग्य वेळेत परत करण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करण्याची चाचणी किंवा पद्धत म्हणजे क्रेडिट रेटिंग. त्यामुळे सामान्य माणसांपासून ते देशापर्यंत सर्वांनाच विकास करण्याकरिता कर्जाची गरज असते व त्याकरिता सर्वांचीच गरज असल्यास क्रेडिट रेटिंग होऊ शकते. भारतात रिझर्व्ह बँकेची मान्यताप्राप्त असलेल्या पतनियामक संस्थांमध्ये क्रिसिल, केअर, आयक्रा किंवा आयसीआरए, फिट्च या नावाजलेल्या संस्था आहेत. या संस्था भारतात बँकांसोबत मिळून क्रेडिट रेटिंगचे काम करतात.
क्रेडिट रेटिंगचे महत्त्व- व्यक्ती, उद्योग, उद्योजक, देश अशा विविध घटकांचे क्रेडिट रेटिंग करता येते. त्यामुळे क्रेडिट रेटिंगचा विस्तार फार मोठा आहे. एखाद्याला गृहखरेदीसाठी, गाडी घेण्याकरिता, व्यक्तिगत खर्च अशा विविध गोष्टींकरिता पैशाची गरज असते. त्याकरिता तो बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. अशा वेळेला बँकेला गरज वाटल्यास बँक त्याचे क्रेडिट रेटिंग करते. त्यामुळे बँकेला त्या व्यक्तीची कर्ज दिलेल्या कालावधीत परत करण्याच्या क्षमतेची पडताळणी करता येते तसेच शाश्वती कळते.
उद्योजकांना आपल्या उद्योग-धंद्याचा विस्तार करण्यासाठी पैशाची गरज असते. त्यामुळे विकासाकरिता लागणारा पैसा उद्योजक बाजारातून विविध मार्गांनी जसे बँक, बाँड्स, आयपीओ व इतर मार्गाने उभारू शकतो. अशा वेळेला त्यांना आपल्या कंपनीचे क्रेडिट रेटिंग करून घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने एखाद्या कंपनीच्या अथवा देशाच्या क्रेडिट रेटिंगची माहिती असल्यास उपयुक्त ठरूशकते. क्रेडिट रेटिंग चांगले असल्यास गुंतवणूकदाराला कंपनी चांगली असल्याची खात्री पटते तसेच बाहेरील देशातील गुंतवणूकदारांचा देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास चांगल्या क्रेडिट रेटिंगमुळे बळावतो. त्यामुळे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे योग्य प्रमाण दर्शवण्याचे प्रयत्न पतनियामक संस्था करत असतात. देशाच्या विकासाला चालना मिळावी व अर्थव्यवस्थेत पारदर्शकता निर्माण व्हावी म्हणून क्रेडिट रेटिंग चांगले असणे गरजेचे आहे.