आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ हजार कोटींचा सेवा कर बुडवला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत जवळपास 9 हजार 800 कोटी रुपयांचा सेवा कर बुडवला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या करबुडव्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा कडक इशारा प्राप्तिकर खात्याने दिला आहे.

अनेक प्रकरणांमध्ये सेवा पुरवठादार आपल्या ग्राहकांकडून सेवा कर वसूल करतात, परंतु सरकारकडे जमा करीत नसल्याचे केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाच्या सेवा कर विभागाच्या सदस्य लिपिका मुजुमदार रॉय चौधरी यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षात दोन हजार कोटी रुपयांची वसुली खात्याने केल्याने सेवा कर बुडवण्याची रक्कम कमी होऊन 7 हजार 800 कोटी रुपयांवर आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाने पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा सेवा कर चुकवलेला शोधून काढला, अशी माहिती रॉय चौधरी यांनी दिली.

सेवा कराचे लक्ष्य गाठणे शक्य - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत सेवा कर संकलनात 34 टक्क्यांनी वाढ झाला आहे. त्यामुळे विद्यमान आर्थिक वर्षातले 1.24 लाख कोटी रुपयांच्या सेवा कर संकलनाचे लक्ष्य गाठता येऊ शकेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कर भरा, अन्यथा कारवाईला सामोरे जा - सर्व सेवा पुरवठादारांनी कायद्याचे पालन करून आपली सेवा कराची थकबाकी भरावी, असे आवाहन केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाने केले आहे. सेवा कर न भरल्यास कायद्यानुसार कर वसुली, व्याज आणि दंड याच्यासह योग्य ती कारवाई करण्यात येईल. योग्य प्रकरणात मालमत्तेवर टाच आणि खटलाही भरण्यात येईल, असा इशारा रॉय चौधरी यांनी दिला आहे.