आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तरीही प्राप्तिकर विभागाची नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाचे ऐकून तुम्ही आर्थिक वर्ष 2011-12 मधील रिटर्न भरले नसतील तर तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते. ज्या वेतनधारकांचे उत्पन्न पाच लाखांपर्यंत आहे आणि ज्यांची उगमस्थानी करकपात (टीडीएस) होते अशांनी रिटर्न भरण्याची गरज नसल्याचे वित्त मंत्रालयाने त्या वेळी जाहीर केले होते, हे विशेष.

यासंदर्भात अनेक पगारदारांनी ‘दिव्य मराठी नेटवर्क’ला माहिती दिली. कमर सिंह (नाव बदलले आहे) रेल्वेत नोकरीला आहेत. आर्थिक वर्ष 2011-12 मध्ये त्यांच्या वेतनातून टीडीएसपोटी 19 हजार रुपयांची कपात करण्यात आली. वर्षाच्या अखेरीस जेव्हा रिटर्न भरण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या कार्यालयाच्या अकाउंट विभागातील सहकार्‍यांनी रिटर्न भरण्याची गरज नसल्याचे त्यांना सांगितले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पगारदारांना रिटर्न भरण्यापासून सवलत दिली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. हे सर्व ऐकल्यानंतर त्यांनी रिटर्न न भरण्याचा निर्णय घेतला. आता प्राप्तिकर विभागाच्या कंप्लायेंस मॅनेजमेंट विभागाकडून कमलसिंह यांना 20 मार्च 2014 रोजी एक पत्र आले. तुम्ही 2011-12 वर्षाचे रिटर्न भरलेले नाही, असे का केले याचे उत्तर 10 दिवसांच्या आत देण्याचे पत्रात नमूद केले आहे. पत्र त्यांना मिळाले तेव्हा 10 दिवसांची मुदत उलटून गेली होती. प्राप्तिकर विभागाची नोटीस पाहून कमलसिंह हैराण झाले आणि दिल्लीस्थित विभागीय कार्यालयात गेले. येथे काहीच होणार नाही, तुम्ही ऑनलाइन अर्ज दाखल करा, असे तेथील अधिकार्‍यांनी त्यांना सुचवले.

वित्त मंत्रालयाच्या 23 जून 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणार्‍या कर्मचार्‍यांना, ज्यांचे व्याजापोटी मिळणारे उत्पन्न 10 हजारांच्या आत आहे अशांनी 2011-12 चे रिटर्न दाखल करण्याची गरज नाही. सीबीडीटी विभागातील प्रवक्ता सुटीवर असल्याने त्यांचे म्हणणे घेता आले नाही. वित्त मंत्रालयातील अधिकार्‍यांच्या मते, प्रणालीतील दोषातून ही नोेटीस जारी झाली असण्याची शक्यता आहे.

काय सांगण्यात आले :
पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणार्‍या कर्मचार्‍यांना, ज्यांचे व्याजापोटी मिळणारे उत्पन्न 10 हजारांच्या आत आहे अशांनी 2011-12 चे रिटर्न दाखल करण्याची गरज नाही.

प्रत्यक्षात होतेय काय :
अशा उत्पन्नाच्या ज्या कर्मचार्‍यांनी आर्थिक वर्ष 2011-12 मध्ये रिटर्न दाखल केले नाहीत अशा कर्मचार्‍यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे.