आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गेल्या 50 वर्षांत भारत 10 पटींनी समृद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 50 वर्षांत भारत अधिकाधिक समृद्ध झाला आहे याचा अनुभव आपण वेगवेगळ्या प्रकारे रोजच घेत असतो. पण 50 वर्षांत झालेले हे बदल आणि आलेली समृद्धी नेमकी मोजायची कशी? वेगवेगळ्या देशांतल्या अर्थव्यवस्थांचा प्रवास याच काळात कसा झाला, कोण किती समृद्ध आहे, 2020 मध्ये आर्थिक महासत्ता कोण होणार, या सर्व प्रश्नांची चर्चा वेगवेगळ्या निमित्ताने जगभर सतत होत असते, पण त्यासंबंधीचे एखादे तयार कोष्टक मात्र आजवर उपलब्ध नव्हते. हे अत्यंत महत्त्वाचे काम अमेरिकेतील ‘पेन्न वर्ल्ड टेबल’ने केले आहे. त्याआधारेच भारत गेल्या 50 वर्षांत 10 पटींनी समृद्ध झाला, हे सिद्ध झाले आहे.

101 देशांचे सर्वेक्षण करून कोष्टक तयार, पेनसिल्व्हेनिया

विद्यापीठातील तीन नामवंत अर्थशास्त्रज्ञांचा पुढाकार
जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांची तपासणी अनेक अर्थतज्ज्ञ वेगवेगळ्या निमित्ताने करत होतेच. अमेरिकन उद्योगांना जगातल्या कोणत्या बाजारपेठेत अधिक वाव मिळेल हे समजण्यासाठीही अशी सर्वेक्षणे आवश्यक मानली गेली. त्यातूनच जगातल्या प्रमुख देशांची माहिती एकत्रित करून तिचा तुलनात्मक अभ्यास एका क्लिकवर उपलब्ध व्हावा, अशी कल्पना पुढे आली. अमेरिकेतील पेनसिलव्हेनिया विद्यापीठातले तीन नामवंत अर्थशास्त्रज्ञ त्यासाठी पुढे आले. अ‍ॅलन हेस्टन, रॉबर्ट समर्स आणि बेटिना अ‍ॅटन या तिघांनी 101 देशांचे सर्वेक्षण करून ‘पेन्न वर्ल्ड टेबल’ तयार केले.

बदलणार्‍या दर्जामुळे सेवा क्षेत्रात समृद्धी निकष ठरवताना अडचण
जगातल्या 101 देशांची अशी आर्थिक पाहणी करणे सोपे काम नव्हते. एकच वस्तू उदा.आयपॅड किंवा सफरचंद विकत घ्यायला वेगवेगळ्या देशांत आज किती किंमत मोजावी लागते हे शोधणे तुलनेने सोपे आहे. पण याच प्रकारच्या वस्तूंची किंमत 1960 मध्ये किती होती हे शोधणे अवघड आहे. त्यातही 1960 मध्ये युरोप-अमेरिकेत मोटारी उपलब्ध असल्या तरी त्या इतर देशांत क्वचितच उपलब्ध होत्या. त्यामुळे मोटार ही सार्वत्रिक समृद्धीची निशाणी मानायची का, असेही प्रश्न होते. पण खरी अडचण सेवा क्षेत्रामध्ये आहे. एखाद्या हॉटेलमध्ये 1960 मध्ये मिळणारे जेवण आणि आज मिळणारे जेवण यामधला फरक फक्त किमतीचा नाही. तो बदलणार्‍या दर्जाचाही आहे. अनेक सेवांचे तर स्वरूपच बदलून गेले आहे. टॅक्सीचे भाडे 1960 मध्ये किती होते, हे सहज समजेल. कारण तेव्हा प्रामुख्याने पद्मिनी गाडीच टॅक्सी म्हणून वापरली जात होती. आता पद्मिनी गेली आणि अनेक वेगवेगळ्या कार टॅक्सी म्हणून उपलब्ध झाल्या. ‘कूलकॅब’ही आल्या. हे सगळे संकेत समृद्धीचे आहेत.

समृद्धी ठरवण्याचे नवे निकष या अर्थतज्ज्ञांना ठरवावे लागले
आपल्या दैनंदिन जीवनासाठी विविध देशांतले लोक नेमक्या कोणत्या वस्तू, धान्य, फळे विकत घेतात, यावरून त्यांची समृद्धी शोधता येते. पण त्यातही एक अडचण आहे - फळांचे प्रतीक म्हणून सफरचंद धरले तर ते सर्व 101 देशांत उपलब्ध असेलच असे नाही. मग निकष, लोक रोजच्या जेवणात किंवा आठवड्यातून किती वेळा फळे खातात, असा राहतो. धान्याचेही तेच आहे. गहू, तांदूळ हे तसे सार्वत्रिक असले तरी त्यापैकी एखादे धान्य निकष म्हणून वापरता येत नाही आणि गहू खाल्ला की समृद्ध, असेही ठरवता येत नाही. त्यामुळे समृद्धी ठरवण्याचे नवे निकष या अर्थतज्ज्ञांना ठरवावे लागले. 1980 मध्ये फोर्ड एस्कॉर्टजवळ असणे समृद्धीचे मानले जात असेल तर आज तोच मान फोर्ड एस्केपला आहे. 1960 मध्ये समृद्धीचे गमक मानल्या जाणार्‍या अनेक वस्तू मागे पडल्या आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार त्या जागी नव्या वस्तू आल्या. त्याचाही मागोवा या अर्थशास्त्रज्ञांना घ्यावा लागला.

समृद्धी कमी-जास्त असली तरी गेल्या 50 वर्षांत सगळे जण समृद्धीच्या दिशेनेच
‘पेन्न वर्ल्ड टेबल’ने समोर आणलेली माहिती सर्वांनाच चकित करणारी आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक देशात वाढलेली समृद्धी कमी-जास्त असली तरी गेल्या 50 वर्षांत सगळे जण समृद्धीच्या दिशेनेच जात आहेत. दरडोई उत्पन्न 50 वर्षांत किती वाढले, एवढा एकच निकष धरला तरी समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. भारतातील दरडोई उत्पन्न 10 पटींनी वाढले याचा आनंद सर्वांना निश्चितच होईल, पण केवळ आशियाई देशांचाच विचार केला तरी आपण किती मागे आहोत हेही लक्षात येते. इंडोनेशियासारख्या छोट्या देशात दरडोई उत्पन्न 13 पटींनी वाढले, तर थायलंडमध्ये ते 22 पटींनी वाढले. भारत आणि चीनची नेहमीच तुलना केली जाते. चीनचे हे उत्पन्न 50 वर्षांत 17 पटींनी वाढले आहे.

2-3 वर्षांतच चीन निश्चितपणे अमेरिकेला मागे टाकेल
या टेबलनुसार चीनची अर्थव्यवस्था आजही अमेरिकेपेक्षा लहान आहे. पण अमेरिकनांसाठी ही खुशखबर फार काळ टिकणारी नाही. सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांचा प्रगतीचा वेग पुढील 10 वर्षे असाच राहिला तर मात्र सर्वस्वी वेगळे चित्र समोर येण्याची शक्यता आहे. पुढच्या 2-3 वर्षांतच चीन निश्चितपणे अमेरिकेला मागे टाकेल आणि 2020 मध्ये एवढा पुढे गेला असेल की, अमेरिका कसाबसा दुसरा क्रमांक राखू शकेल. त्या वेळी चीनचे दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या दीडपट झालेले असेल.

अर्थव्यवस्थेची प्रगती, योग्य निर्णय वेळीच घेतले तर अधिक पटीने होऊ शकते प्रगती
या टेबलमध्ये वेगवेगळ्या निकषांवर गेल्या 50 वर्षांतील अर्थव्यवस्थेची वाढ आणि समृद्धी जोखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण सतत विज्ञान आणि तंत्रज्ञानात होणारे बदल मोठी आर्थिक क्रांती घडवून आणत असतात आणि याचा वेध आताच घेणे अशक्य असते. याचा अनुभव आपण गेल्या 20 वर्षांत झालेल्या तंत्रज्ञान बदलात घेतला आहे. त्यामुळे पुढील 10 वर्षे जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था आहे त्याच गतीने प्रगती करतील, असे मानण्याचे कारण नाही. गेल्या 50 वर्षांत भारतातील समृद्धी 10 पटींनी वाढली असली तरी खरे बदल सर्व क्षेत्रांत गेल्या 20 वर्षांत झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती आपण योग्य निर्णय वेळीच घेतले तर अधिक पटीने सहज होऊ शकते.

ग्रामीण भागात स्थानिक समृद्धीची नवी केंद्रे उभी राहिली तर चीनच्या जवळ जाऊ शकू
चीन भारतापेक्षा पुढे गेला आहे, हे वास्तव आहे. त्याचे महत्त्वाचे कारण तेथील नियंत्रित अर्थव्यवस्था हे आहे. भारतात लोकशाही असल्यामुळे अनेक महत्त्वाचे औद्योगिक प्रकल्प, धरण-वीज प्रकल्प लोकांच्या विरोधामुळे वर्षानुवर्षे अडकून पडतात. तसे चीनमध्ये होत नाही. पण तरीही गेल्या 20 वर्षांत भारताने वेगवान प्रगती केली. याचे महत्त्वाचे कारण जागतिकीकरणाने लोकांना, उद्योजकांना दिलेली नवी संधी हे आहे. तिचा वापर खेड्यापाड्यांपर्यंत आपण आग्रहपूर्वक करू शकलो तर समृद्धी शहरांकडून खेड्यांकडे अशी प्रवाहित न होता ग्रामीण भागात स्थानिक समृद्धीची नवी केंद्रे उभी राहू शकतील आणि आपणही चीनच्या जवळ जाऊ शकू यात शंका नाही.
(लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत)