नवी दिल्ली - भारतासाठी आगामी काळ अत्यंत उत्तम आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या अपेक्षा उंचावल्या असल्याचे मत हार्वर्ड स्कूल ऑफ बिझनेसचे अधिष्ठाता नितीन नोहरिया यांनी व्यक्त केले. केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी सरकारी उच्चपदस्थ अधिकार्यांना मार्गदर्शन केले.
नोहरिया म्हणाले, जागतिक परिस्थितीचा विचार केल्यास भारतासाठी अनुकूल स्थिती आहे. दशकापूर्वी भारत अत्यंत आकर्षक होता. मात्र, पाच वर्षांपूर्वी अनेकांनी सांगितले की भारतात गुंतवणूक करायची असेल तर थोडी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. सध्या भारतासाठी परीक्षेचा काळ आहे. पाच वर्षांपूर्वी असणारे चीनबाबतचे आकर्षण आता कमी झाले आहे. अशा स्थितीत भारत गुंतवणुकीसाठी पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
ते म्हणाले, विदेशी गुंतवणूकदार संस्था (एफआयआय) सध्या सहा महिने वाट पाहणे पसंत करतील. नव्या सरकारने ज्या अपेक्षा उंचावल्या आहेत त्या ठोस निर्णयात बदलतात की नाही हे पाहणे एफआयआयच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यानंतर थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात होईल. अमेरिकास्थित या प्रतिष्ठित बिझनेस स्कूलचे नोहरिया हे भारतीय वंशांचे पहिले अधिष्ठाता आहेत. नव्या सरकारला मिळालेले स्पष्ट बहुमत व्यवसायासाठी उत्तम असल्याचे ते म्हणाले.
विकासदर 5.5 टक्के : फिच
आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी फिचच्या मते, स्पष्ट बहुमत मिळाल्याने एनडीए सरकार आर्थिक सुधारणा करण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 2014-15 मध्ये देशाचा विकास दर 5.5 टक्के राहण्याची शक्यता आहे, तर 2015-16 मध्ये हा दर वाढून 6 टक्क्यांवरून 6.5 टक्के होईल, असे फिचला वाटते. फिचच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यात आर्थिक सुधारणांचे स्पष्ट संकेत दिसतात. अर्थसंकल्पातून सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचा कल स्पष्ट होईल. ज्या तरतुदी होतील त्यावरून आर्थिक विकास कोणत्या पातळीवर जाईल हे स्पष्ट होईल.
(फोटो - हार्वर्ड स्कूल ऑफ बिझनेसचे अधिष्ठाता नितीन नोहरिया)