आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादन घटणार, डाळी कडाडणार !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लागवडीचे कमी प्रमाण आणि हरभरा पिकवणा-या काही प्रमुख भागातल्या जमिनीतील कमी झालेला ओलसरपणा यामुळे 30 जूनअखेर संपणा-या चालू पीक वर्षात डाळींचे उत्पादन 10 ते 15 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज इंडिया पल्सेस अ‍ॅँड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण डोंगरे यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला. जगातील सर्वात मोठा डाळ उत्पादक आणि ग्राहक असलेल्या देशात 2010 -11 वर्षात 18.1दशलक्ष मेट्रिक टन डाळीचे विक्रमी उत्पादन झाले होते. या उत्पादनात हरभ-याचा वाटा सर्वाधिक 45 टक्के आहे.
पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी हंगामात दक्षिण भारतामध्ये हरभ-याचे उत्पादन 50 टक्के झाले आहे. या भागात हरभ-याला 80 ते 90 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतक-यांनी हरभरा लागवडीला पसंती दिली आहे. परिणामी आंध्र प्रदेश व कर्नाटकमध्ये हरभ-याची 50 टक्के लागवड झाली असल्याची माहिती डोंगरे यांनी दिली.
महाराष्टÑातील हरभरा लागवडीच्या परिस्थितीबद्दल डोंगरे म्हणाले की, राज्यात यंदा चांगला पाऊस झाला असला तर पेरणीच्या अगोदर आणि नंतर हवा तसा पाऊस झालेला नाही. धरणांमधील पाणी शेतीसाठी कमी प्रमाणात सोडण्यात येत असून ते पिण्यासाठी साठवून ठेवण्यात आले आहे. परिणामी हरभरा उत्पादन 20 टक्क्यांनी घटले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मध्य प्रदेशात हरभ-याची लागवड मागील वर्षाच्या तुलनेत 5 ते 10
टक्क्यांनी जास्त झाली आहे.
राजस्थानकडे नजर
हरभ-याच्या उत्पादनासाठी राजस्थान हे एक प्रकारे वाइल्ड कार्ड ठरणार आहे. येत्या पाच ते सात दिवसांत जर राजस्थानमध्ये चांगला पाऊस झाला तर हरभ-याचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज आहे. शुक्रवारच्या हवामान अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस तरी पावसाची चिन्हे नाहीत त्यामुळे पाऊस पडला नाही तर 20 ते 25 टक्के उत्पादन घटण्याची भीती
डोंगरे यांनी व्यक्त केली.
पांढ-या आणि हिरव्या हरभ-यासाठी उत्तर प्रदेश प्रसिद्ध आहे. कानपूर आणि हातरस या भागात हिरव्या हरभ-याचे जास्त उत्पादन होते. या भागातही पेरणी चांगली झाली होती. पाऊस चांगला झाला तर या भागात 5 लाख टन नाही, तर 3 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

आशियाई देशांतील हरभरा
आयात वाढणार
पीक कमी आल्यामुळे आशियाई देशांवर 20 दशलक्ष टनांची (वार्षिक) गरज भागवण्यासाठी जास्त प्रमाणात डाळींची आयात करावी लागण्याची शक्यता आहे. 2010 -11 या वर्षात देशात कॅनडा, म्यानमार, अमेरिका, फ्रान्स, आॅस्ट्रेलिया, तुर्की या देशांमधून 2.75 दशलक्ष टन डाळींची आयात करण्यात आली होती.

शेतकरी वळले गहू लागवडीकडे
गव्हाच्या लागवडीवर चांगला परतावा मिळत असल्याने अनेक शेतक-यांनी हरभ-याऐवजी गव्हासारख्या नगदी पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. परिणामी, हरभरा लागवडीला फटका बसण्याची शक्यता डोंगरे यांनी व्यक्त केली.

महागाई वाढण्याची शक्यता नाही
देशामध्ये उडीद, तूर यांसारख्या डाळींनी गेल्या 3 वर्षांचा नीचांक गाठला आहे; परंतु तुटवड्यामुळे डाळीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने किमती वाढणार नाही तसेच अन्नधान्याची सध्या थंड होत असलेली महागाई पुन्हा भडकण्याची शक्यताही डोंगरे यांनी साफ नाकारली.