मुंबई- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणातून मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात ऊर्जा, पायाभूत सुविधा, रेल्वे, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांच्या वाट्याला सर्वाधिक निधी येणार हे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील निवडक समभागांत गुंतवणूक करणे फायद्याचे राहणार आहे. यासाठी लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स पॉवर, टाटा पॉवर, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, आयआरबी इन्फ्रा, इप्का लॅब, टीटागन वॅगन, बीईएमएल, कोल इंडिया आणि जैन इरिगेशन या समभागांतील गुंतवणूक लाभदायी ठरणार आहे.
एल अँड टी
>प्रत्येक राज्यात आयआयटी, आयआयएम उघडणार. शिवाय 100 नवी शहरे वसवणार.
>यावरून आगामी काळात देशातील पायाभूत सुुविधा वाढवण्यावर भर राहील. यात एल अँड टीसारख्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणाच नफा होईल. तांत्रिक विश्लेषक ए.के. प्रभाकर यांच्या मते, अर्थसंकल्पापूर्वी एल अँड टीची खरेदी उत्तम राहील
ऊर्जा समभाग
>ज्या क्षेत्रातून जास्त रोजगार संधी जास्त निर्माण होतील त्यात थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) वाढवणार
>सरकारच्या या निकषात ऊर्जा क्षेत्र सर्वात वरच्या क्रमांकावर येते. मिंट डायरेक्टचे संशोधन प्रमुख अविनाश गोरक्षकर यांच्या मते, ऊर्जा क्षेत्रातील टाटा पॉवर आणि रिलायन्स पॉवर या सर्वात चांगल्या कंपन्या आहेत. यातून बजेटपूर्वी चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
रेल्वे
>रेल्वे क्षेत्रात सुधारणा करणार. देशाच्या किनारपट्टी व डोंगराळ भागात लोहमार्गाचे जाळे विणण्यासाठी एफडीआय लागू करण्यावर भर.
>सरकारच्या या योजनेमुळे रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल. फिनेथिक वेल्थ र्स्व्हिसेसचे संचालक व्ही.के. नेगी यांनी टीटागण व्हॅगन आणि बीईएमएल खरेदीची शिफारस केली आहे.
बांधकाम कंपन्या
प्रत्येक गाव राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार. पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर.
>यामुळे बांधकाम कंपन्यांना चांगले दिवस येतील. प्रभाकर यांच्या मते, आयआरबी इन्फ्रा आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपन्यांना या घोषणेमुळे सर्वात जास्त फायदा होईल.
कोल इंडिया
>देशातील गुंतवणुकीला चालना मिळण्यासाठी सरकार कोळसा क्षेत्रात सुधारणा करणार
>अभिभाषणातील या घोषणेनंतर कोल इंडियाच्या समभागांत पाच टक्क्यांपेक्षा जास्त तेजी दिसून आली. गोरक्षकर यांच्या मते, बजेटपर्यंत कोल इंडियाच्या समभागात तेजी राहील. गुंतवणूकदार सध्याच्या भावात समभाग खरेदी करून नफा मिळवू शकतात.
इप्का लॅब
>आरोग्य सेवा क्षेत्रात एफडीआय लागू करण्याचा सरकारचा विचार
>या क्षेत्रातून जास्त रोजगार निर्मिती होण्याला वाव आहे. त्यामुळे या क्षेत्रात एफडीआय लागू होईल. अशा स्थितीत इप्का लॅब या क्षेत्रातील अशी कंपनी आहे जी बजेटपूर्वी चांगला नफा देऊ शकते.
जैन इरिगेशन
कृषी क्षेत्राच्या विकासावर भर. सिंचनाच्या सुविधांचे आधुनिकीकरण करणार.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार मोठी पावले टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोरक्षकर यांच्या मते, गुंतवणूकदारांनी जैन एरिगेशन समभागांची खरेदी करून नफा पदरात पाडून घ्यावा.