आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाडव्यापूर्वीच बाजारात तेजीची गुढी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गुढय़ा उभारण्यासाठी अद्याप चार दिवस बाकी असले तरी भांडवल बाजारात मात्र खरेदी पाडव्याला जोर आला आहे. जागतिक पातळीवरील सकारात्मक घडामोडी आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून वाढलेला गुंतवणुकीचा वेग यामुळे मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने 22,095.30 आणि निफ्टी 6,601.40 अंकांची आणखी एक विक्रमी गुढी उभारून बाजारातील तेजीचे स्वागत केले.

सकाळच्या सत्रात भक्कम तेजी असल्याने सेन्सेक्स भक्कम पातळीवर उघडला. त्यानंतर त्याने दिवसभरात 22,172.10 अंकांची ऐतिहासिक कमाल पातळी गाठली. परंतु नंतर सेन्सेक्सच्या या वाढत्या गतीला थोडाफार धक्का बसला. तरीही दिवसअखेर 40.49 अंकांची वाढ नोंदवत 22,172.10 अंकांच्या ऐतिहासिक पातळीवरच बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकही दिवसभरात 6672.45 अंकांच्या नव्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचला. निफ्टीमध्ये दिवसअखेर 11.65 अंकांची वाढ होऊन तो 6,600 अंकांच्या वर म्हणजे 6,601.40 अंकांच्या पातळीवर पहिल्यांदाच बंद झाला. भांडवल बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी तब्बल 1,223.28 कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ खरेदी केली आहे. या तुफान खरेदीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या खरेदीबरोबरच जागतिक पातळीवरील सकारात्मक घडामोडींचा मोठा प्रभाव बाजारावर पडला आहे. चीन, रशिया, ब्राझील यांच्यासह चार सर्वात मोठय़ा उगवत्या बाजारपेठांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे यंदाच्या वर्षात सेन्सेक्स भक्कम स्थिती कायम राखत 4.6 टक्क्यांनी वाढला आहे.

गुरुवारी फ्यूचर अँड ऑप्शनच्या व्यवहारांची मुदत संपत असल्याने गुंतवणूकदारांनी आपले व्यवहार आटोक्यात ठेवले. रिझर्व्ह बॅँकेच्या एक एप्रिल रोजी जाहीर होणार्‍या नाणेनिधी धोरण आढाव्याच्या अगोदर गुंतवणूकदारांनी बँक, वाहन, स्थावर मालमत्ता समभागांच्या खरेदीवर जास्त भर दिला. त्याच्याच जोडीला धातू, भांडवली वस्तू, रिफायनरी, वाहन समभागांनादेखील चांगली मागणी आली. परंतु औषध, माहिती तंत्रज्ञान, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि तंत्रज्ञान समभागांनीदेखील गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. अमेरिकेची सकारात्मक आकडेवारी तसेच युक्रेन-क्रिमियामधील पेचप्रसंगाची कमी झालेली धग यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला असल्याचे मत व्हेरासिटी ब्रोकिंगचे संशोधन प्रमुख जिग्नेश चौधरी यांनी व्यक्त केले.

टॉप गेनर्स
एसएसएलटी, हिंदाल्को, टाटा मोटर्स, कोल इंडिया, एल अँड टी, अँक्सिस बँक, टाटा स्टील, मारुती सुझुकी, ओएनजीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज ऑटो, रिलायन्स, भारती एअरटेल, गेल इंडिया.
टॉप लुझर्स
डॉ. रेड्डी लॅब, सन फार्मा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, सिप्ला, आयटीसी.