आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय बँका ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्‍यात अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अद्ययावत ऑनलाइन बँकिंग सेवा, व्यवहार सक्षमता, एटीएमचे सहज सुलभ व्यवहार आदी विविध गुणांच्या निकषावर बँकांनी ‘समाधानी ग्राहक’ निर्माण करण्यात चांगले यश मिळवले आहे. त्यामुळेच ‘सॅप’ने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये ‘समाधानी ग्राहकांच्या’ यादीत भारताने सर्वात आघाडीचे स्थान पटकावले असल्याचे दिसून आले आहे.


‘आयडीसी’ने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणामध्ये समाधानी बँक ग्राहकांमध्ये भारताने सर्वाधिक 8.5 गुण मिळवल्याचे दिसून आले असून त्यापाठोपाठ इंडोनेशिया (8.33), न्यूझीलंड (8.27) आणि चीन (7.93) या देशांचा क्रमांक लागतो. भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, इंडोनेशिया, मलेशिया, न्यूझीलंड आणि सिंगापूर या देशांमधील 600 बँक ग्राहकांचे सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.


बँकिंग प्रणाली अद्ययावत करण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये बँकांकडून करण्यात येत असलेल्या गुंतवणुकीचा फायदा ग्राहकांना होत आहे. विशेष करून बँकांच्या ऑनलाइन सेवा प्राप्त करण्यामध्ये भारतीय बँक ग्राहक जास्त समाधानी आहेत. त्याचबरोबर व्यवहार सक्षमता तसेच सुयोग्य ठिकाणी या सेवांची उपलब्धी याबाबतही ते समाधानी असल्याचे सॅप आशिया - प्रशांत आणि जपानचे वरिष्ठ उपाध्यक्ष (वित्तीय सेवा) अँड्र्यू पीचर यांनी सांगितले.
ऑनलाइन बँकिंग सेवा हे अद्यापही एक महत्त्वाचे माध्यम मानले जात असले तरी जवळपास फोन बँकिंग सुविधांचा वापर करणा-या भारतीय ग्राहकांचे प्रमाण 30 टक्के असल्याचे ते म्हणाले.


भारतामध्ये एसएमएसवर आधारित प्रणाली लोकप्रिय असली तरी त्याच्याच जोडीला आता स्मार्टफोनच्या माध्यमातून मोबाइल बँकिंग करण्याकडे कल वाढत आहे. परंतु स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण कमी असल्याने अद्याप हव्या त्या प्रमाणात मोबाइल बँकिंगने जोर पकडलेला नाही. परंतु बँका आता ग्राहकांना व्यवहार करणे अधिक सुलभ होण्यासाठी निरनिराळे अ‍ॅप्स आणत आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानात बँका गुंतवणूक करीत असल्याने हे चित्रदेखील लवकरच बदलेल, असे सॅप इंडियाचे बँकिंग आणि वित्तीय सेवा विभागाचे संचालक विक्रांत चौधरी यांनी सांगितले.


बदलता ग्राहकवर्ग, मध्यमवर्गाचा विस्तार, झपाट्याने होत असलेले नागरीकरण या विविध कारणांमुळे बँकांसाठी विविध प्रकारच्या नवीन संधी निर्माण होत असून त्याच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत पीचर यांनी व्यक्त केले.


भारताला 8.5 गुण
‘आयडीसी’ने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणामध्ये समाधानी बँक ग्राहकांमध्ये भारताने सर्वाधिक 8.5 गुण मिळवल्याचे दिसून आले असून त्यापाठोपाठ इंडोनेशिया (8.33), न्यूझीलंड (8.27) आणि चीन (7.93) या देशांचा क्रमांक लागतो. भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, इंडोनेशिया, मलेशिया, न्यूझीलंड आणि सिंगापूर या देशांमधील 600 बँक ग्राहकांचे सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.


सुविधांकडे लक्ष
ग्राहकांचे बँक व्यवहार जास्तीत जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने बँकांकडून तंत्रज्ञानात जास्त गुंतवणूक केली जात आहे. परंतु त्याचबरोबर या बँकांच्या सामाजिक भूमिकेतून हे ग्राहक जास्त समाधानी होत आहेत. वाढत्या स्पर्धेबरोबरच बँकिंग उद्योग स्वत:मध्ये लक्षणीय बदल घडवून आणत आहेत. नवीन तरुण ग्राहक नवीन उपकरणांच्या माध्यमातून बँकिंग सेवा प्राप्त करीत आहेत. बँकाही जोखीम व्यवस्थापनावर भर देतानाच ग्राहकाभिमुख विचारातून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत असल्याचेदेखील चौधरी म्हणाले.