आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्था सावरते आहे; महामंदीच्या काळातही हे दिलासादायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातल्या उद्योगक्षेत्रामध्ये फारसे काही घडत नसल्याचा सूर आळवला जात असताना, वेगवेगळ्या माध्यमातून हाती आलेल्या माहितीमधून अर्थव्यवस्था सावरते आहे, असाच निष्कर्ष काढावा लागतो. गेली दोन - तीन वर्षे जागतिक महामंदीमुळे उत्पादन, विक्री या सर्वच क्षेत्रामध्ये मोठी मंदी नि:संशयपणे जाणवत होती. सर्वसाधारणपणे अशा बिकट अवस्थेमध्ये नवे उद्योग सहसा उभे राहत नाहीत, पण कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या माहितीमधून वेगळेच चित्र समोर आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशभरात तब्बल एक लाख कंपन्यांची नोंदणी झाली आहे. त्यांचे एकूण भांडवल 39 हजार कोटींच्या पुढे आहे.
महामंदीच्या काळात लाखो लोकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे रोजगार क्षेत्रातील मंदी अशीच चालू राहणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ‘सीबीआरई’ या संशोधन संस्थेने अलीकडे एक मोठे सर्वेक्षण केले. त्यामध्ये पुढील 2 वर्षांत 4 ते 5 लाख नवीन रोजगार निर्माण होतील, असे म्हटले आहे. रोजगाराच्या या नव्या संधी आयटी, आयटी आधारित उद्योग आणि आयटीपूरक सेवा क्षेत्र यामध्ये असणार आहेत. त्याबरोबरीने बँकिंग, विमाक्षेत्र, इतर वित्तसंस्थांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. अर्थात संशोधन, उद्योगसल्ला, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी, कारखानदारी आणि दळणवळण ही क्षेत्रही रोजगार निर्मितीत पुढे असतील.
20-22 वर्षांपूर्वी जागतिकीकरणाला मान्यता दिली. त्यावेळी अर्थव्यवस्था खालावलेली होती :
आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण याबद्दल आपल्याकडे नकारात्मकतेने बोलणारे लोक आजही आहेत. 20-22 वर्षांपूर्वी जागतिकीकरणाला आपण मान्यता दिली. त्यावेळी आपली अर्थव्यवस्था अत्यंत खालावलेली होती. जागतिक दर्जाचा एकही अव्वल उद्योग तेव्हा भारतामध्ये नव्हता. फोर्ब्ज या नियतकालिकाने नुकतीच जगातील दोन हजार अव्वल उद्योगांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये 54 भारतीय उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. अव्वल उद्योग ठरविताना मुख्यत: एकूण महसूल, नफा, मालमत्ता आणि त्या उद्योगाचे सध्याचे बाजारमूल्य या गोष्टी विचारात घेतल्या जातात. यानुसार जगातील सर्वांत मोठे तीन उद्योग चीनमध्ये आहेत आणि पहिल्या 10 मधील पाच मोठे उद्योगही चीनमध्ये आहेत. फोर्ब्जच्या यादीत अमेरिकन उद्योग सर्वाधिक म्हणजे 564 आहेत, तर जपानमधील मोठ्या उद्योगांची संख्या 225 आहे. अमेरिका, चीन आणि जपान यांच्यापाठोपाठ आपला क्रमांक लागतो, हे जागतिकीकरणाचे मोठे यश आहे.
भारतातील नं. 1 रिलायन्स उद्योग जागतिक क्रमवारीत 135 वा तर एस बीआय 155 व्या क्रमांकावर
भारतीय उद्योगांच्या यादीत ‘रिलायन्स’ पहिल्या क्रमांकावर असणार, हे तर उघडच आहे, पण दोन हजार उद्योगांच्या यादीत रिलायन्स 135 व्या क्रमांकावर पोहोचला आहे, हे महत्त्वाचे. त्यापाठोपाठ भारतीय स्टेट बँकेने 155 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 2003 मध्ये फोर्ब्जच्या यादीत फक्त 46 देशांतील उद्योग होते. आता यात 62 देशांचा समावेश आहे. महामंदीच्या काळातही जगभरचे उद्योग आपली प्रगती टिकवून आहेत, हे दिलासादायक आहे.
ज्या क्षेत्रात मंदीचा सर्वाधिक प्रभाव आहे, त्याच क्षेत्रामध्ये हे नवे उद्योग उतरले आहेत
15 हजार नव्या उद्योगांची नोंदणी उत्पादनक्षेत्रात झाली
या अहवालातील सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी, की ज्या क्षेत्रात मंदीचा सर्वाधिक प्रभाव आहे, असे मानले जाते, त्याच क्षेत्रामध्ये हे नवे उद्योग उतरले आहेत. कारखानदारी किंवा उत्पादनक्षेत्राची वाढ शून्याच्या खाली घसरली असताना कोणी नव्याने या क्षेत्रात पदार्पण करेल, असे वाटत नव्हते. पण जवळपास 15 हजार नव्या उद्योगांची नोंदणी उत्पादनक्षेत्रात झाली आहे.
10 हजारांहून अधिक बांधकाम व्यावसायिक या क्षेत्रात उतरलेत
मंदीने ग्रासलेले दुसरे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र. गुंतवलेले लाखो कोटी रुपये परत कसे येणार, याची चिंता या क्षेत्राला लागली असताना, 10 हजारांहून अधिक बांधकाम व्यावसायिक या क्षेत्रात नव्या संकल्पना घेऊन उतरले आहेत. सेवाक्षेत्र हे अर्थव्यवस्थेतील वाढीचे सर्वांत आकर्षक क्षेत्र असल्यामुळे 32 हजार 254 उद्योगांची नोंदणी या क्षेत्रात झाली आहे.
नियोजित नोंदणीकृत सर्व कंपन्या, कार्यालये सुरू झाल्यास, किमान चार ते पाच लाख कर्मचार्‍यांची गरज भासेल :
या संशोधन संस्थेने काढलेल्या या निष्कर्षांचा संदर्भ अगदी वेगळा आणि महत्त्वाचा आहे. मुळात पुढील वर्षभरात देशात उद्योगधंदे आणि व्यावसायिक कार्यालयांसाठी किती जागा बांधून उपलब्ध होईल, याचा शोध संस्थेने व्यापक सर्वेक्षण करून घेतला. 2015 अखेरपर्यंत देशात सात ते आठ कोटी चौरस फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या जागा व्यावसायिक कार्यालयांसाठी उपलब्ध होतील. त्यापैकी बहुतांश जागा आयटी किंवा आयटीआधारित उद्योग आणि बँकिंगसह इतर वित्तसंस्थांसाठी बांधल्या जात आहेत. उद्योग व्यवसायासाठीचे हे प्रचंड बांधकाम प्रामुख्याने बंगळुरू, दिल्ली व परिसर, मुंबई व परिसर या भागात होत आहे.