आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय आरोग्य उत्पादने जगभर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुसंख्येने भारतीय तरुणच अमेरिकेत जाऊन वैद्यकीय संशोधन करतात, विकतात बहुसंख्येने भारतीय तरुणच अमेरिकेत जाऊन वैद्यकीय संशोधन करतात आणि त्यावर आधारित उत्पादने, साधने अमेरिकन कंपन्या जगभर विकतात. आता थोडे वेगळे घडते आहे. देशात मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असलेल्या स्टार्टअप कंपन्यांचे लक्ष आरोग्य क्षेत्राकडेही वळले आहे, आणि व्हेंचर कॅपिटलच्या भक्कम पाठबळामुळे आश्चर्यकारक वाटावीत अशी नवी आरोग्य उत्पादने बाजारपेठेत येत आहेत. त्यांचे जगभर कौतुक आणि स्वागतही होत आहे. यामध्ये परदेशातून परत मायभूमीत आलेल्या संशोधकांचा वाटाही महत्त्वाचा आहे. म्हणजे ‘ब्रेन गेन’ आणि निर्यातप्रधान आरोग्य उत्पादने असे हे दुहेरी यश आहे.

कॅन्सर शस्त्रक्रियेसाठी आता रोबो
कॅन्सर हा तर जगभर उच्छाद मांडत असलेला महत्त्वाचा रोग आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार 2020 पर्यंत भारतातील प्रत्येक कुटुंबात एक कॅन्सर पेशंट असेल. दरवर्षी भारतात 6 लाख लोक कॅन्सरने मृत्युमुखी पडतात. त्यापैकी 70 टक्के लोक 30 ते 69 या वयोगटातले असतात. यावरून कॅन्सरसंबंधीचे कोणतेही संशोधन किती महत्त्वाचे आहे, ते आपल्या लक्षात येईल. कॅन्सरवर अत्याधुनिक उपचार केले जाणार्‍या जगभरातल्या हॉस्पिटल्समध्ये एक नवे तंत्रज्ञान वापरले जाते. कॅन्सरच्या गाठीची थेट शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्या भागात एक सुई खुपसून औषध आत सोडले जाते. या औषधाने गाठ जळून जाते किंवा फ्रिज केली जाते. पण ही शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. अनेकदा सुई थेट गाठीपर्यंत पोहोचतच नाही. आता या शस्त्रक्रियेसाठी मदतीला आला आहे, तो चेन्नईमध्ये तयार झालेला एक रोबो.
रोबोची बाजारात (किंमत 80 लाख ते दीड कोटी)

चेन्नईच्या परफिंट हेल्थ केअर या कंपनीने ‘रोबिओ’ या नावाने हा रोबो बाजारात आणला आहे. कॅन्सरच्या गाठीवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना हा रोबो सर्व प्रकारचे मार्गदर्शन करतो. सुई नेमकी कुठे खुपसायची आहे, वाटेत कुठे अडथळे आहेत का, असले तर सुईसाठी पर्यायी जागा कोणती, या सर्व गोष्टी तो सांगतोच; शिवाय रोबो अत्यंत कुशल आणि वेगवान असल्याने गाठीवर केला जाणारा उपचार कमीत कमी वेळात, अत्यंत अचूकपणे आणि पेशंटला कमीत कमी वेदना होतील, अशा पद्धतीने केला जातो. साहजिकच डॉक्टरांच्या मनावरचा आणि शरीरावरचा ताणही कमी होतो, उपचारातील गुंतागुंतही कमी होते. याच कंपनीने ‘मॅक्सिओ’ या नावाचा आणखी एक रोबोही बाजारात आणला आहे. या उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेल्या अल्गोरिथम आणि सॉफ्टवेअरमुळे डॉक्टरांना कॅन्सरची गाठ पाहता येते, उपचारांचे नियोजन करता येते आणि सुरक्षितपणे ती गाठ काढताही येते. कंपनीने आतापर्यंत असे 120 रोबो जगभरातल्या हॉस्पिटल्सना विकले आहेत. दीड लाख ते तीन लाख अमेरिकन डॉलर्स एवढी या रोबोंची किंमत असून कंपनीने 50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

मित्रा बायोटेकने कॅन्सर थेरपी विकसित
कॅन्सरवर उपचार करत असताना डॉक्टरांना औषधयोजना, प्रयोग करत करतच ठरवावी लागते. कॅन्सर नेमका केवढा आणि कुठे आहे, हे समजत असले तरी प्रत्येक व्यक्तीनुसार त्याची औषधयोजना मात्र बदलत जाते. पण ही योजना सापडण्यातच खूप वेळ आणि पैसा वाया जातो. शिवाय साइड इफेक्ट्स होतात, हे वेगळेच. कोणाला कोणती औषधयोजना करावी हे सहज व लवकर समजले तर किती बरे होईल, असे सर्वांनाच वाटत होते. आता बंगलोरच्या मित्रा बायोटेकने अशी पर्सनलाइज्ड कॅन्सर थेरपी विकसित केली आहे. डॉक्टर मित्रा हे अमेरिकेतल्या हार्वर्ड आणि एमआयटी या संशोधन केंद्रात अनेक वर्षे संशोधन करत होते, ते आणि त्यांच्या सहकार्‍यांनी भारतात परतून बंगलोरला मित्रा बायोटेक ही कंपनी 2008 मध्ये स्थापन केली आणि ‘ऑन्कोप्रिंट आर’ नावाचे तंत्रज्ञान विकसित केले. हे करत असताना जगभरातल्या कॅन्सर पेशंट्सची संपूर्ण माहिती त्यांनी जमा केली. कोणत्या प्रकारचे पेशंट कोणत्या औषधयोजनेला प्रतिसाद देतात, हे शोधून काढले आणि त्यामधून हे तंत्रज्ञान पुढे आले. डॉ.मित्रा मुळातच जगभरातल्या नामवंत हॉस्पिटल्सशी संबंधित असल्याने या तंत्राचा वापर सर्वत्र सुरू झाला. जगभरातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

जगभर कॅन्सरवर औषध शोधण्याचे प्रयत्न, मात्र भारतात असे औषध चक्क तयार झालेय
जगभर कॅन्सरवर रामबाण औषध शोधण्याचे प्रयत्न अनेक वर्षे चालू आहेत. पण असे औषध चक्क भारतात तयार झाले आहे, असे सांगितले तर आपल्याला धक्का बसेल. पण हे सत्य आहे. इथेही पुन्हा ‘ब्रेन गेन’ आहे. हार्वर्ड आणि एमआयटीमध्ये शिलादित्य सेनगुप्ता हे अनेक वर्षे संशोधन करत होते. आता दिल्लीत येऊन त्यांनी स्वत:ची कंपनी स्थापन केली. इन्व्हिक्टस ऑन्कॉलॉजी (कल्ल५्रू३४२ ङ्मल्लूङ्म’ङ्मॅ८) हे या कंपनीचे नाव. या कंपनीने कॅन्सरसाठी एक सूक्ष्म औषध-नॅनो ड्रग- बनवले आहे. हे औषध किती सूक्ष्म आहे? तर मानवी केसाच्या एक हजारांश एवढे ते सूक्ष्म आहे. ते आधी कॅन्सरच्या गाठीवर जाऊन बसते. प्रथम गाठीचे साइड इफेक्ट्स कमी करते, नंतर गाठीला होणारा रक्तपुरवठा थांबवून गाठ निर्जीव करते कॅन्सरची गाठ पूर्ण मरेपर्यंत ते काम करत राहते. अशाच औषधाच्या एका डोसची अमेरिकेतील किंमत 9 हजार डॉलर्स आहे. सेनगुप्तांचे औषध तुलनेने खूप स्वस्तात उपलब्ध होईल.

स्टेम सेल्सची चर्चा सध्या जगभर सुरू,
सांगलीच्या मराठी डॉक्टरांची यात आघाडी स्टेम सेल्सची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. या संशोधनात सांगलीच्या एका मराठी डॉक्टरांनी आघाडी घेतल्याचे आपल्याला माहीत आहेच. पण हे स्टेम सेल्स मानवी शरीरातून वेगळे करण्याची प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे. स्टेम्प्युटिक्स रिसर्च या संस्थेने आपल्या संशोधनातून असे स्टेम सेल्स शरीरातून सहजपणे वेगळे करता येतील, असे उपकरण तयार केले आहे. त्यामुळे कॉस्मेटिक सर्जरी करणार्‍यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. स्टेम्प्युट्रॉन नाव असलेले हे उपकरण भारतात 20 लाख रुपयांना उपलब्ध झाले आहे. अमेरिकेत त्याची किंमत पाचपट म्हणजे 1 कोटी इतकी आहे. जगभरातली कॉस्मेटिक सर्जरीची बाजारपेठ 40 अब्ज डॉलर्सची आहे, आणि त्यातील भारताचे स्थान चौथे आहे. आपल्याकडे दरवर्षी अशा साडेआठ लाख शस्त्रक्रिया होतात. या वर्षी आरोग्यक्षेत्रात व्हेंचर कॅपिटल कंपन्यांकडून सर्वाधिक म्हणजे 81 कोटी 70 लाख डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. यामुळे ‘ब्रेन गेन’च्या आधारे उभ्या राहिलेल्या स्टार्ट अप कंपन्या थेट जागतिक पातळीवर जात आहेत.
(लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत)