मुंबई - सध्या आर्थिक मंदीच्या झळा बसत असल्या तरी येणा-या काळात मात्र आर्थिक वृद्धी पुन्हा एक नवीन भरारी घेणार आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत भारतीयांच्या संपत्तीत दुपटीने वाढ होऊन ती सध्याच्या 2.20 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 411 लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या आर्थिक विकासदर पाच टक्क्यांवर रेंगाळत आहे; परंतु अलीकडेच हाती घेतलेल्या सुधारणांचे दिसू लागलेले चांगले परिणाम आणि केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर येणाºया काही वर्षांत आर्थिक विकासदर सहा ते साडेसहा टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता कार्व्ही प्रायव्हेट हेल्थने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. आर्थिक आणि प्रत्यक्ष मालमत्ता या दोन्हीमधील संपत्तीचे प्रमाण सध्या 55:45 असे स्थिर आहे; परंतु या मालमत्तांच्या स्वरूपात मात्र थोडाफार वेगळा प्रवाह आला असल्याचे कार्व्ही प्रायव्हेट वेल्थचे मुख्य अधिकारी सुनील मिश्रा यांनी या अहवालाच्या अनावरणप्रसंगी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर भांडवल बाजार नवी भरारी घेण्याची शक्यता लक्षात घेता वित्तीय गुंतवणुकीत प्रत्यक्ष समभाग गुंतवणुकीचे प्रमाण 22 वरून 28 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे विम्यातील गुंतवणुकीचे प्रमाण 19 टक्के वाढीची शक्यता आहे. बचत ठेवी, मुदत ठेवी आणि रोखीचे प्रमाण कमी झाल्याने हे प्रमाण वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ‘सेकंड होम’साठी :
रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही केवळ ‘सेकंड होम’च्या खरेदीसाठी होत असून सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 86 टक्के भारतीयांकडे स्वत:चे घर आहे. स्वत:चे हक्काचे घर घेण्यासाठी जितक्या जास्त प्रमाणात लोक प्रयत्न करतील तितके गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल. याचा परिणाम हा सोने आणि स्थावर मालमत्ता यांच्या प्रत्यक्ष मालमत्तेच्या प्रमाणावर झाला आहे. अगोदर हे प्रमाण 65:35 टक्के होते; परंतु आता ते 52:48 असे झाले आहे. त्यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणूक पुढील तीन वर्षांत दुपटीने वाढणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.