आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिव्हर्स फार्माकॉलॉजीचा उपयोग भारताला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध व्याधींवर परिणामकारक औषधे निर्माण करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. त्यासाठी शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगशाळेत नवनव्या रेणूंचा शोध घेत असतात आणि त्यांच्या गुणधर्माचा उपयोग करून नवनवी औषधे तयार केली जातात. या औषधांचा प्रयोग रुग्णालयातील रुग्णांवर केला जातो. ही झाली प्रचलित फार्माकॉलॉजी. रिव्हर्स फार्माकॉलॉजीत हा प्रवास नेमका उलट्या दिशेने होतो. रुग्णालयातील रुग्णांवर विविध औषधांचे प्रयोग केले जातात. त्यासोबत किंवा स्वतंत्रपणे पारंपरिक औषधेही वापरली जातात. त्याबाबतचे अनुभव आणि सतत तपासण्या यातून औषधाची उपयुक्तता पाहिली जाते आणि मग ते औषध योग्य वाटल्यास त्यावर आधारित औषधनिर्मिती करून ती बाजारात आणली जातात. पाश्चात्त्य औषध निर्मात्यांचे लक्ष आता या रिव्हर्स फार्माकॉलॉजीकडे मोठ्या प्रमाणात वळते आहे. त्याचा सर्वाधिक उपयोग भारताला करून घेता येईल, अशी आयुर्वेदाची परंपरा आहे.
आयुर्वेदिक औषधांचे विशिष्ट संहितेनुसार
पेटंट घेण्याचे प्रयत्न अवघड
आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार जगभर करण्याचे प्रयत्न आयुर्वेदातील तज्ज्ञ, औषध कंपन्या करत आहेतच. त्याबरोबरच केंद्र सरकारच्या ‘आयुष’ विभागानेही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पाश्चात्त्य देशांत मागच्या दाराने आयुर्वेदाला मान्यता आणि लोकप्रियता मिळत असली तरी या देशांनी अधिकृत ‘पॅथी’ म्हणून त्याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे या प्रसार-प्रचारात अनेक अडथळे निर्माण होतात. आयुर्वेदात एकाच रोगावरचे एकाच नावाचे औषध चरकसंहितेत निराळे तर सुश्रुत संहितेत निराळे असते. आपल्या कंपन्या त्यावर ते औषध कोणत्या संहितेप्रमाणे बनवले आहे ते लिहितात. पण पाश्चात्त्य जग पेटंटवर चालते. त्यामुळे वेगवेगळ्या संहितांप्रमाणे अशी वेगवेगळी औषधे त्यांना मान्य होत नाहीत. आयुर्वेदिक औषधांचे विशिष्ट संहितेनुसार पेटंट घेण्याचे प्रयत्नही आपल्याला करणे अवघड जाते. कारण हे ग्रंथ सर्वांना खुले आहेत. पेटंट मात्र एखाद्याच कंपनीला मिळणार आहे, या प्रकारचे वाद त्यामधून उद्भवतात आणि आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान मागे पडत जाते. आयुर्वेदाची ही कोंडी फोडण्याचे काम अलीकडेच डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ.भूषण पटवर्धन या दोन शास्त्रज्ञांनी केले आहे. ‘ड्रग डिस्कव्हरी टुडे’ हे औषध जगतात ख्यातनाम असलेले मासिक नव्या नव्या शोधांची माहिती आणि संकल्पना वैद्यकीय जगतापर्यंत पोहोचवत असते. या मासिकाच्या अंकात या दोघा शास्त्रज्ञांचा एक महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. ‘ट्रॅडिशनल मेडिसिन इन्स्पायर्ड अ‍ॅप्रोचेस टू ड्रग डिस्कव्हरी : कॅन आयुर्वेद शो द वे फॉरवर्ड?’ असे या शोधनिबंधाचे शीर्षक आहे. या मासिकात असा एखादा शोधनिबंध प्रसिद्ध होणे म्हणजे त्या संकल्पनेला पाश्चात्त्य वैद्यकीय जगताची मान्यता आहे. त्यामुळे या शोधनिबंधामुळे नवीन औषधनिर्मितीसाठी आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करणे शक्य होणार आहे.
आयुर्वेदिक भस्मे तर आधुनिक नॅनो तंत्रज्ञानाचे दोन हजार वर्षांपूर्वी झालेले प्रयोगीकरण
आयुर्वेदातील औषधे अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने प्रमाणित केलेली असतात. आयुर्वेदिक भस्मे तर आधुनिक नॅनो तंत्रज्ञानाचे दोन हजार वर्षांपूर्वी झालेले प्रयोगीकरण आहे. त्याबाहेरही हजारो वनौषधी पारंपरिकरीत्या आपण घरोघर वापरत असतो. पण त्याचे आधुनिक औषधात रूपांतर होतेच असे नाही. रिव्हर्स फार्माकॉलॉजी या संकल्पनेमुळे आता आयुर्वेदिक संशोधनाला आधुनिक औषधनिर्मितीचे नवे दालन खुले होणार आहे. हे नवे दालन खुले होणार असले तरी आयुर्वेदातील ज्ञान आपल्याच हातात राहावे, स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागेल.
नोंदी ठेवण्याचे संशोधनतंत्र वापरात यावे
रिव्हर्स फार्माकॉलॉजीमध्ये मुळात रुग्णांवर त्या औषधांचे सातत्यपूर्ण प्रयोग करावे लागतात आणि त्या प्रयोगांची नोंद ठेवावी लागते. यातून आलेले निष्कर्ष अंतिम औषधनिर्मितीसाठी उपयोगी पडतात. अशा प्रकारचे संशोधनतंत्र आपल्याकडे फारसे वापरात नाही. सर्व आयुर्वेदिक रुग्णालयांतून या पद्धतीची नोंद ठेवणारी यंत्रणा तयार करावी लागेल. काही मोठ्या आयुर्वेदिक औषध कंपन्यांनी अशी रुग्णालये उभारली आहेत. पण तेवढी पुरेशी नाहीत. सरकारी पातळीवर काही घडेल याची वाट न पाहता खासगी उद्योगांना स्वतंत्रपणे यात उतरावे लागेल. आयुर्वेदिक संशोधन आणि शास्त्रशुद्ध माहितीसह रुग्णांवरील उपचार एकत्र आले तर हे ज्ञान पारंपरिक न राहता त्याचा ग्रामीण भागापर्यंत नव्या पद्धतीने वापर होऊ शकेल. स्थानिक रोगांवरील संशोधनाला यामधून चालना मिळू शकेल.
आयुर्वेदिक संहितांवर आधारित औषधनिर्मिती
आजही भारतात मोठ्या प्रमाणात
आयुर्वेदिक संहितांवर आधारित औषधनिर्मिती आजही भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. काही कंपन्यांमध्ये स्वतंत्र संशोधनही होते आहे. पण या बहुतेक कंपन्या पाश्चात्त्यांच्या तुलनेत छोट्या आणि विशिष्ट क्षेत्रात किंवा राज्यात काम करणार्‍या आहेत. त्यामुळे एकाच नावाची पाच-दहा कंपन्यांची औषधे आज बाजारात उपलब्ध असतात. आयुर्वेदतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच रुग्ण ही औषधे घेतात. पण अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर त्यांचा वापर करत नाहीत. कारण संहितेनुसार औषधांच्या पॅकवर दिलेली माहिती त्यांच्या आकलनाबाहेरची असते. हा तिढा सोडवायचा असेल तर उत्पादनांची माहिती आधुनिक तंत्राने देण्याबरोबरच त्यांना आधुनिक नावे शोधणेही आवश्यक आहे. ज्या कंपन्या हे तंत्र वापरत आहेत त्यांची उत्पादने चटकन लोकप्रिय होताना दिसत आहेत. त्याचा वापर वाढायला हवा. आयुर्वेदिक औषधांच्या बळावर जागतिक बाजारपेठेत उतरायचे असेल तर औषध उत्पादन करणारी कंपनी मोठ्या आकाराची आणि मोठ्या क्षमतेची हवी. त्यासाठी आवश्यक तर दोन किंवा अधिक कंपन्यांनी एकत्र येणे अथवा संयुक्त कंपनी स्थापन करणे आवश्यक ठरणार आहे. भारतीय औषध कंपन्यांना हे लक्षात आले आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांत काही प्रमुख कंपन्यांनी परदेशातील औषध कंपन्या विकत घेऊन आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांची सांगड घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबरोबरच नवी नवी संशोधने घेऊन नव्या कंपन्याही बाजारात येत आहेत, ही उत्साहवर्धक गोष्ट आहे. आयुर्वेदिक औषधनिर्मिती वेगाने गतिमान होत असताना त्यासाठी लागणार्‍या पुरेशा वनौषधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. आजच अशा वनौषधींची कमतरता भासते आहे. त्यामुळे औषधी वनस्पतींची आग्रहपूर्वक लागवड करून त्यांचा योग्य आणि संतुलित पुरवठा हादेखील एक स्वतंत्र उद्योग होणार आहे. शेतीच्या इतर पिकांबरोबरच औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे शेतकरी वळले तर शेतीलाही चांगले दिवस येतील.
(लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत)