आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ, भूतान येथे चालणार भारतीय नोटा - व्यापार वाढल्याने निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - नेपाळ आणि भूतानमध्ये आता भारतीय ५०० व १००० रुपयांची नोट चालणार आहे. बिहारमधून नेपाळ आणि भूतान यांच्याशी वाढलेला व्यापार लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमधून मोठ्या संख्येने व्यापारी माल विक्रीसाठी नेपाळ, भूतानमध्ये जातात. या देशांत १०० रुपयांवरील भारतीय चलन वापरण्यास बंदी असल्याने या व्यापा-यांना व्यवहारात अनेक अडचणी यायच्या. तसेच बिहारमधून सुटीसाठी नेपाळमध्ये जाणा-या सर्वसामान्यांनाही जवळ केवळ १०० रुपयांच्या प्रमाणात रक्कम बाळगावी लागायची. आता ५०० व १००० रुपयांची नोट बाळगता येणार असून रकमेसाठी २५,००० रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ही मर्यादा वाढवण्याबाबत रिझर्व्ह बँक विचार करत असून त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

दिलासादायी निर्णय : मला अद्याप या निर्णयाची माहिती नाही, मात्र असे झाले असेल तर चेंबरची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे छोटे व्यावसायिक व सर्वसामान्यांचा चांगला फायदा होणार आहे. याबरोबरच रकमेची मर्यादा वाढवणे आवश्यक असल्याचे मत बिहार चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ओ. पी. साह यांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँकेचे विभागीय संचालक मनोजकुमार वर्मा म्हणाले, यासंदर्भात अंतिम निर्णय झाला आहे. हे आदेश लवकरच सार्वजनिक होतील. यामुळे बिहारमधील व्यापा-यांचा फायदा सर्वाधिक होणार आहे.