आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Sky Open To The Tata ; Finance Ministry Sanction Air Asia's Proposal

टाटांना भारतीय आकाश खुले.. ; वित्त मंत्रालयाची एअर एशिया प्रस्तावाला मंजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टाटा समूहाशी संयुक्त सहकार्य करून नवीन विमान कंपनी सुरू करण्याच्या मलेशियातील एअर एशिया या विमान कंपनीच्या गुंतवणूक प्रस्तावाला वित्त मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात विदेशी विमान कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी सरकारने आकाश खुले केल्यानंतर भरारी घेणारी ‘एअर एशिया’ ही पहिली कंपनी ठरली आहे.

विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या झालेल्या बैठकीतील कार्यक्रम पत्रिकेत एअर एशिया इन्व्हेस्टमेंट मलेशियाच्या गुंतवणूक प्रस्तावाची नोंद होती. एअर एशिया या कंपनीने टाटा सन्स लिमिटेड आणि अरुण भाटिया यांच्या टेलेस्ट्रा ट्रेडप्लेस प्रा.लि. या कंपन्यांबरोबरच्या सहकार्यातील 49 टक्के भांडवली गुंतवणूक करण्यासाठी अर्ज केला होता. नियमानुसार, विदेशात विमान सेवा सुरू करण्यास पात्र ठरण्यासाठी संबंधित कंपनीला स्थानिक पातळीवरील विमानसेवेमध्ये पाच वर्षे पूर्ण झालेली असणे बंधनकारक आहे.

नवीन धोरणानुसार विदेशी विमान कंपन्यांना भारतीय विमान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे सुलभ झाले आहे. एअर एशिया आणि टाटा समूहाची नवीन विमान कंपनी या वर्षाच्या अखेरपासून 3 ते 4 विमानांच्या मदतीने आपल्या
सेवेला प्रारंभ करणार असून मलेशियाच्या या विमान कंपनीने जवळपास 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक या विमानसेवेसाठी केली आहे.

संयुक्त सहकार्यातून सुरू करण्यात येणा-या या प्रस्तावित नवीन विमान कंपनीचे कामकाज चेन्नई येथून चालणार असून द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांवर मुख्य लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे मलेशियातील सेपांग येथे मुख्यालय असलेल्या एअर एशियाने म्हटले आहे.

मिठापासून ते सॉफ्टवेअर व्यवसायापर्यंत पंख पसरलेल्या टाटा सन्स या कंपनीचे संयुक्त सहकार्यात 30 टक्के भांडवल असेल. परंतु ही विमान कंपनी चालवण्याच्या दृष्टीने कंपनी कोणतीही भूमिका बजावणार नाही.
टाटा समूह पुन्हा विमान व्यवसायात
या संयुक्त सहकार्याच्या माध्यमातून टाटा समूह पुन्हा एकदा विमान व्यवसायात प्रवेश करीत आहे. या अगोदर सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडिया आणि टाटा एअरलाइन्स यांनी 1932 मध्ये विमान सेवा सुरू केली होती. या संयुक्त सहकार्यासाठी एअर एशिया, टाटा, हिंदुस्तान एव्हिएशन यांनी भागीदारी करार केला आहे. एफआयपीबीकडे अन्य 23 गुंतवणूक प्रस्तावांबरोबरच युरोपातील कार्गो विमान कंपनी असलेल्या ‘फार्नएअर स्वित्झर्लंड एजी’ या कंपनीचा गुंतवणूक प्रस्तावदेखील आला होता. ‘फार्नएअर’ने गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ‘क्विकजेट’ मधील मोठा भांडवली हिस्सा खरेदी केला होता. क्विकजेट कार्गोमध्ये टाटा कॅपिटल लि. एक प्रमुख गुंतवणूकदार कंपनी आहे.