मुंबई - अवघ्या काही दिवसांवर आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आर्थिक वाढीला नवसंजीवनी देण्याबरोबरच वित्तीय तूट कमी करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे आश्वासक उद्गार वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काढल्यामुळे बाजाराला मोठा दिलासा मिळाला. बाजारात उत्साहात झालेल्या खरेदीत सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीने नव्या विक्रमी पातळीची नोंद केली.
भांडवल बाजारात सातत्याने येत असलेला निधीचा ओघ आणि जागतिक बाजारातील स्थिर वातावरण यामुळेही बाजारातील खरेदीचा जोर वाढला. बाजारात झालेल्या चौफेर खरेदीमध्ये धातू, आरोग्य, ऊर्जा, भांडवली वस्तू, वाहन, बहुराष्ट्रीय कंपन्या, बॅँका आणि ग्राहकोपयोगी वस्तू या सर्व 12 क्षेत्रीय निर्देशांकांनी भरारी घेतली.
आशियाई शेअर बाजारातील स्थिर वातावरणामुळे सेन्सेक्स सकाळी चांगल्या पातळीवर उघडला. त्यानंतर तर सेन्सेक्सने 25,864.53 कमाल पातळी गाठली. दिवसअखेर सेन्सेक्स 25,841.21 अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला. त्याच वेळी त्यात 324.86 अंकांची वाढ झाली.
सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्समध्ये 778.54 अंकांची वाढ नोंद झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील मधल्या सत्रात 7732.40 अंकांच्या कमाल पातळीवर गेला होता. निफ्टी 90.45 अंकांनी वाढून 7725.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बजेटवर नजरा
अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात धाडसी निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत अर्थमंत्र्यांनी दिल्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे मत रेलिगेअर सिक्युरिटीजचे किरकोळ वितरण विभागाचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी व्यक्त केले.
टॉप गेनर्स
सेसा स्टरलाइट, एनटीपीसी, भेल, एचडीएफसी, मारुती सुझुकी, कोल इंडिया, सन फार्मा, महिंद्रा अॅँड महिंद्रा, एचडीएफसी बॅँक, हिंदाल्को, एल अॅँड टी, सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅब, आयटीसी, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, रिलायन्स, आयसीआयसीआय बॅँक
सेन्सेक्स गाठू शकतो 27 हजारांचा पल्ला
मोदी सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत सेन्सेक्स 27 हजार अंकांचे शिखर गाठण्याचा अंदाज बॅँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने व्यक्त केला आहे. कमी पाऊस आणि इराकमधील पेचप्रसंगामुळे नजीकच्या काळात ताण जाणवणार असला ती अपेक्षित सुधारणांमुळे बाजार या पातळीवर जाऊ शकेल, असे मत या ब्रोकरेज कंपनीने व्यक्त केले आहे.
विदेशी गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी
विदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने गुंतवणूक केली असून त्यांनी मंगळवारी 856.35 समभागांची खरेदी केली.आशियाई शेअर बाजारातील तेजी, डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुधारलेली प्रकृती, जून महिन्यात उत्पादन क्षेत्रात चांगली झालेली वाढ या सगळ्या गोष्टींमुळे बाजारातील खरेदीचा जोर वाढला.
रुपयाची भरभरून कमाई
अर्थसंकल्पात चांगल्या तरतुदी असतील या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यानंतर बळ मिळालेल्या रुपयाने बुधवारी डॉलरची यथेच्छ धुलाई केली. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 38 पैशाची कमाई करत 59.69 ही पातळी गाठली. सात आठवड्यातील एक सत्रातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद रुपयाने केली.
सोने-चांदी स्वस्त
डॉलरच्या तुलनेत रुपया बळकट झाल्याचा परिणाम सराफा बाजारावर झाला. सोने तोळ्यामागे 230 रुपयांनी स्वस्त होऊन 28,500 झाले, तर चांदी किलोमागे 500 रुपयांनी घसरून 44,800 झाली.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)