आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रावणमासी हर्ष बाजारी, तेजी दाटे चोहीकडे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जुलै महिन्यात निर्यातीने घेतलेली उच्चांकी भरारी आणि रुपयाची घसरण थांबवण्यासाठी सरकार आणखी पावले टाकण्याच्या आशेने बाजार ऐन श्रावणात तेजीचा हर्ष आला. उत्साही खरेदीमुळे सेन्सेक्स 157.64 अंकांनी वाढून 18,946.98 वर बंद झाला. निफ्टीने 46.75 अंकांची कमाई करत 5612.40 ही पातळी गाठली. तिकडे सराफा बाजारात सोने 405 रुपयांनी वाढले, तर चांदीने 1300 रुपयाची चकाकी भरारी घेतली. किरकोळ महागाईचा दर जुलैमध्ये 9.64 टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यामुळे बाजारात सोमवारी श्रावणमासी हर्ष मानसी, तेजी दाटे चोहीकडे, असे वातावरण निर्माण झाले.

सेन्सेक्सचे दीडशतक
मुंबई शेअर बाजारात सोमवारी सकाळच्या सत्रापासूनच खरेदीचे वातावरण होते. धातू, एफएमसीजी, फार्मा, भांडवली वस्तू, सार्वजनिक उद्योग आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागांची चागली मागणी आली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जून तिमाहीमधील खराब कामगिरीचा बँकेच्या समभागांवर परिणाम झाला. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 20 समभागांनी कमाई केली. आशियातील चीन, हाँगकाँग, सिंगापूर, द. कोरियाचे शेअर बाजारात तेजी होती. युरोपातील फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनच्या वाजारात नकारात्मक कल दिसून आला.

बँकांवर दबाव : एफएमसीजी, धातू आणि आयटी क्षेत्राच्या तुलनेत बँकिंग क्षेत्रावर मोठा दबाव आहे.

सोने-चांदी चकाकले
नवी दिल्ली - सणांचा हंगाम आणि जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेत यामुळे सोने तसेच चांदीला मागणी वाढली आहे. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 405 रुपयांनी वाढून 29,260 झाले. चांदी मात्र किलोमागे 1370 रुपयांची उसळी घेत 44,120 पर्यंत पोहोचली.

सोन्याच्या आयातीला आळा बसण्यासाठी सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात सोन्याची आयात घटली. देशात आता सणांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याला मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने तेजी आल्याचे सराफा व्यापार्‍यांनी सांगितले. जागतिक बाजारातील तेजीनेही सोन्याच्या झळाळीला बळ मिळाले.

किरकोळ महागाई 9.64 %
नवी दिल्ली - जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर 9.64 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जूनमध्ये हा दर 9.87 टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर जूनपूर्वीच्या सलग तीन महिन्यात सातत्याने घसरणीचा कल दाखवत होता. अन्नधान्य महागाईचा दर जुलैमध्ये 11.24 टक्के झाला. त्याआदी तो 11.84 टक्के होता. तृणधान्ये आणि कडधान्याची महागाई कमी होत अनुक्रमे 16.03 आणि 5.55 टक्क्यांवर आली आहे. फळांच्या किमती 7.49 टक्क्यांवरून 6.81 टक्के झाल्या आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती 7.96 टक्क्यांवरून 8.14 टक्के झाल्या. भाजीपाल्याच्या किमती 12.69 टक्क्यांवरून 13.82 टक्क्यांवर पोहोचल्या.