आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Stock Markets All Set For A Bounce back, Say Analysts

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजारात तेजीचा श्रावण, सेन्सेक्स 19 हजारांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चालू खात्यातील तूट आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार आणखी ठोस पावले उचलत असल्यामुळे रुपयालादेखील मजबुती मिळेल, अशी आशा बाजाराला वाटू लागली आहे. या आशेवरच बाजारात झालेल्या चौफेर खरेदीमध्ये सेन्सेक्सने 283 अंकांची गेल्या महिनाभरातील सर्वाधिक वाढ नोंदवली.

जागतिक शेअर बाजारातील तेजी आणि भांडवली निधीचा येत असलेला ओघ यामुळे आनंदित झालेल्या गुंतवणूकदारांनी स्थावर मालमत्ता, बँका आणि वाहन समभागांची तुफान खरेदी केली.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स खालच्या पातळीवर उघडून तो 18,864 अंकांच्या पातळी खाली गेला होता. कारण सोमवारी जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीमुळे बाजारात मरगळ होती. परंतु सोने आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेली शुल्कवाढ यासारख्या उपाययोजना चालू खात्यातील तूट आटोक्यात आणण्यासाठी साहाय्यभूत ठरतील, अशी आशा बाजाराला वाटत आहे. रुपयात आणखी सुधारणा झाल्यानेही बाजाराला दिलासा दिला. त्यामुळे बाजारात झालेल्या मूल्याधिष्ठित समभाग खरेदीत सेन्सेक्स 282.86 अंकांनी वाढून 19,229.84 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याअगोदर 12 जुलैला सेन्सेक्सने एकाच दिवसात 282.41 अंकांची वाढ नोंदवली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 86.90 अंकांनी वाढून 5699.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

महागाईचे प्रमाण घटत असल्यामुळे व्याजदर कमी होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळेच बाजारात व्याजदर संवेदनशील समभागांना चांगली मागणी आल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी व्यक्त केले.