आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीच्या लाटेत निर्देशांकांचे विक्रमी उच्चांक, सेन्सेक्स 292 अंकांनी वाढला, निफ्टी सुसाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलग आठ सत्रांत तेजीच्या लाटेवर स्वार असलेल्या शेअर बाजाराने मंगळवारी पुन्हा एकदा विक्रमी पातळीची नोंद केली. भारतभेटीवर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताची त्यांचासमवेतची चर्चा यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे.
त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीची भर पडल्याने सेन्सेक्स, निफ्टीने नवे उच्चांक नोंदवले. सेन्सेक्स २९२.२० अंकांच्या उसळीसह २९,५७१.०४ वर पोहोचला. निफ्टीने इंट्रा डे व्यवहारात ८९०० चा टप्पा आेलांडला. दिवसअखेर निफ्टी ७४.९० अंकांच्या कमाईसह ८९१०.५० वर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांचा हा सार्वकालीन उच्चांक आहे.
ब्रोकर्सनी सांगितले, युरोपियन सेंट्रल बँकेने रोखे खरेदीचा कार्यक्रम जाहीर केल्याने भारतातील विदेशी गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा बाजाराला आहे. तसेच ओबामा यांच्या भारत भेटीतील चर्चेने गुंतवणूकदारांच्या उत्साहात भर पडली आहे. अणुकरारातील विघ्ने दूर झाल्याचे संकेत मिळाल्याने भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांना चांगला भाव आला. त्याचबरोबर वाहन, बँका समभागांची जोरदार खरेदी झाल्याने बाजारात तेजीला उधाण आले.आशियातील चीन हाँगकाँग वगळता इतर सर्व बाजार तेजीत दिसून आले. युरोपातील प्रमुख बाजारांत घसरणीचा कल दिसून आला.
तेजीचे मानकरी : अॅक्सिसबँक, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, मारुती, लार्सन अँड टुब्रो.
सकारात्मक परिणाम
अमेरिकाआणि भारत यांच्या अणुकराराबाबत झालेल्या चर्चेचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढून जोरदार खरेदी झाली. जिग्नेशचौधरी, रिसर्च हेड, व्हेरासिटी ब्रोकिंग