आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन अबकारी शुल्क कपात मार्चपर्यंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाहनांच्या विक्रीमध्ये ऑगस्टमध्ये सलग चौथ्या महिन्यात चांगली वाढ झाल्यामुळे वाहन कंपन्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आनंदातच आणखी भर पडली, कारण सरकार वाहन क्षेत्रावरील अबकारी सवलतीची मर्यादा आता डिसेंबरनंतरही कायम ठेवण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. ही सवलत आणखी कायम राहिली तर या कंपन्यांसाठी एक प्रकारे दुधात साखरच पडल्यासारखे होणार आहे.

अबकारी शुल्कातील सवलत योजना डिसेंबरच्या पुढेही कायम ठेवण्याच्या प्रस्तावावर आम्ही अगाेदरच चर्चा केली आहे. सरकार योग्य वेळी याबाबत निर्णय घेईल, असे अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी ‘एसीएमए’च्या परिषदेच्या वेळी सांगितले. अवजड उद्योग मंत्रालयही अबकारी शुल्काची सवलत ३१ मार्चपर्यंत कायम ठेवण्याबाबतचा आपला प्रस्ताव वित्तमंत्रालयाकडे पाठवण्याची शक्यता माहीतगार सूत्रांनी व्यक्त केली.
ग्राहकांबरोबरच वाहन कंपन्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सरकारने यंदाच्या जून महिन्यामध्ये अबकारी शुल्कात देण्यात आलेली मुदत ३१ डिसेंबर म्हणजे आणखी सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या अगोदर ही सवलत केवळ ३० जूनपर्यंत वैध होती. वाहन उद्योगातील मागणी घसरल्यामुळे कंपन्या चिंतेत पडल्या होत्या. त्यामुळे या मागणीला चालना देण्यासाठी अगोदरच्या सरकारने हंगामी अर्थसंकल्पात ग्राहकोपयोगी वस्तू तसेच वाहनांवरील अबकारी शुल्कात कपात करण्याची घोषणा केली होती. ही सवलत कायम राहिल्यास त्याचा वाहन उद्योगाला फायदा होणार आहे. अगोदरच्या १२ टक्क्यांच्या तुलनेत अबकारी कर सध्या आठ टक्के इतका कमी करण्यात आला आहे. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) वरील अबकारी शुल्क ३० टक्क्यांवरून २४ टक्क्यांवर, तर मोठ्या मोटारींवरील २४ टक्के शुल्क कायम आहे. अगोदर ते २७ टक्के होते.

ग्राहकांचा फायदा
बहुतांश मोटार कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती कमी करून या अबकारी शुल्क कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवला होता. वाहन उद्याेगानेदेखील या शुल्क कपातीला मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. देशातील वाहन विक्री गेल्या आर्थिक वर्षात ४.६५ टक्क्यांनी घसरून १७,८६,८९९ वाहनांवर आली, तर त्या अगोदरच्या वर्षात ही विक्री तब्बल ६.६९ टक्क्यांनी घसरल्याने वाहन कंपन्यांना पहिला मोठा धक्का बसला होता.

वाहन विक्री वाढीचा गिअर
तब्बल दो न वर्षांचा रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर आता देशातील वाहन विक्री वाढीचा गिअर टाकत वेग घेऊ लागली आहे. त्यामुळेच सलग चौथ्या महिन्यात देशातील मोटार विक्रीत १५.१६ टक्क्यांनी वाढ नोंदवल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट मधील १,३३,५१३च्या तुलनेत यंदाच्या ऑगस्ट मध्ये १,५३,७५८ मोटारींची विक्री झाली आहे. मासिक आधारावर विक्रीत सुधारणा असून वाहन उद्योग वाढीची नोंद करत असल्याचे सियामचे संचालक विष्णू माथूर म्हणाले.