आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India's Exports Show Double digit Uptick For First Time In 2 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन वर्षांनंतर निर्यातीत वाढ, मागील महिन्यात 11.64 %

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांपासून हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांना आता चांगली फळे येऊ लागली आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या जुलै महिन्यात आयातीचे प्रमाण घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे, तर दुसर्‍या बाजूने निर्यातीने सर्वाधिक 11.64 टक्के वाढीची नोंद केली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर निर्यातीत वाढ झाल्यामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेतही थोडीशी चेतना येण्यास मदत झाली आहे.

घटलेली आयात आणि निर्यातीत झालेली लक्षणीय वाढ झाल्यामुळे जूनमधील 12.2 अब्ज डॉलरच्या व्यापार तुटीमध्ये कोणताही बदल न होता ती आहे त्याच पातळीवर कायम राहिली आहे. त्यातच रुपयाच्या अवमूल्यनाने चालू खात्यातील तुटीवरचा ताण मात्र वाढला आहे.

जुलै महिन्यात निर्यात वाढून 25.83 अब्ज डॉलरवर गेली असून आयात घसरून 38.1 अब्ज डॉलरवर आली आहे. विशेष म्हणजे सोने आणि चांदीची आयात याच कालावधीत 34 टक्क्यांनी घसरून ती 4.4 अब्ज डॉलरवरून 2.9 अब्ज डॉलरवर आली आहे. त्यामुळे व्यापार तूट जून महिन्यातील पातळीवरच कायम राहिली आहे.

गेल्या वर्षात झालेल 300.6 अब्ज डॉलरच्या निर्यातीच्या तुलनेत किंचितशी चांगली कामगिरी झाली आहे, असे ते म्हणाले.
एप्रिल ते जुलै या कालावधीत निर्यात 1.72 टक्क्यांनी वाढून ती 98.2 अब्ज डॉलरवर, तर आयात 2.82 टक्क्यांनी वाढून 160.7 अब्ज डॉलरवर गेली. व्यापार तूट यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत 62.4 अब्ज डॉलर झाली होती. मे आणि जून या कालावधीत निर्यात नकारात्मक पातळीत होती; परंतु सप्टेंबर 2011 मध्ये निर्यातीत 35 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली होती. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 10 टक्के निर्यातवाढीचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. मध्यम कालावधीत नवीन उपाययोजनांमुळे निर्यातीची कामगिरी काहीशी चांगली होऊ शकेल, असा आशावाद वाणिज्य सचिवांनी व्यक्त केला.

उपायांमुळे गाडी रुळावर
गेल्या सहा महिन्यांत सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळेच निर्यातवाढीची गाडी पुन्हा रुळावर येऊ शकली. निर्यातीने साध्य केलेली दोन अंकी वाढ तसेच अमेरिका आणि युरोप राष्ट्रसंघातील सकारात्मक घडामोडी लक्षात घेता येणार्‍या महिन्यांमध्येदेखील निर्यातवाढीचा कल असाच कायम राहील. एफआयईओ.

आणखी सुधारणा होईल
व्याज अनुदानात वाढ करण्यासह केंद्र सरकारने अलीकडेच केलेल्या उपाययोजनांमुळे निर्यातवाढ होण्यास मदत झाली आहे. या उपाययोजनांमुळे येणार्‍या काही महिन्यांत निर्यात लक्ष्य कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची आशा आहे. आफ्रिका, पूर्व अमेरिका, आसिआन आणि अतिपूर्वेकडील देशांकडून मागणी वाढल्यामुळे निर्यातीला गती मिळू शकली, असे मत वाणिज्य सचिव एस. आर. राव यांनी व्यक्त केले.