आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India's Gold Guzzling Still High, Spurs Neighbors To Act

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुल्काचा भार, सोने जाणार 30 हजारांपार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सणांचा हंगाम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेत यामुळे सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंत मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी तेजी दिसून आली. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 565 रुपयांनी वाढून 29,825 झाले. चांदी किलोमागे 1845 रुपयांच्या कमाईसह 45,965 पर्यंत पोहोचली.

चार महिन्यांनंतर सोन्याने गाठलेली ही उच्चांकी पातळी आहे. स्टॉकिस्टस आणि ज्वेलर्सकडून मागणी वाढल्याने सोने- चांदी तेजीत आल्याचे सराफा व्यापार्‍यांनी सांगितले. सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकाराने जी पावले उचलली त्यामुळे सोन्याच्या पुरवठय़ावर परिणाम झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी सध्या सराफा बाजारात स्थिती आहे. त्यामुळे सोने तेजीत राहण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क बाजारात सोने औंसमागे 22.60 डॉलरनी वधारून 1337.30 डॉलरवर पोहोचले. चांदी औंसमागे 4.23 टक्के वाढून 21.43 डॉलर झाली. गेल्या सात दिवसांत सोन्याच्या किमती एक हजार रुपयांनी वाढल्या आहेत.

सोने 32 हजारांवर जाणार
रुपयाला मजबुती देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असली तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही उलट हा मौल्यवान धातू आणखी महाग होण्याची भीती आहे. ऐन सणासुदीत सोने 32 हजार, तर चांदीचा भाव 50 हजारांवर जाण्याचा अंदाज बुलियन तज्ज्ञ अश्विन देरासरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

तेजीची कारणे
0 प्रमुख विदेशी चलनांच्या तुलनेत डॉलर वधारला
0 अमेरिकेत प्रमुख आर्थिक आकडेवारीत घसरण
0 अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून आर्थिक सहायता पॅकेज मागे घेण्याचे संकेत
0 जगातील प्रमुख शेअर बाजारांतील घसरणीने सोन्याला बळ
0 देशातील सणांच्या हंगामाची सुरुवात
0 आयात घटल्याने पुरवठा कमी आणि मागणी जास्त

चार महिन्यांचा उच्चांक
स्थानिक बाजारात सोने 11 एप्रिलनंतर प्रथमच उच्चंकी स्तरावर पोहोचले आहे. एप्रिलमध्ये सोन्यामध्ये मोठी घसरण झाली होती. त्यामुळे सोने 31 हजारांवरून घसरून एकदम 26,400 पर्यंत खाली आले होते. मे-जूनमध्ये सोने 27 ते 28 हजारांच्या पातळीत राहिले. या काळात सोने 25,700 रुपयांपर्यंत घसरले होते. याच काळात सोन्यात तोळ्यामागे 2700 रुपयांपर्यंतची तेजी दिसून आली होती. आता सोन्यातील घसरण मागे पडली असून लवकरच सोने तोळ्यामागे 30 हजारांचा टप्पा ओलांडेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.